निवडणूक नगरपंचायतची : प्रचाराला मिळाला अधिक वेळराजू बांते मोहाडीजिल्ह्यात भाजपाचे तीन आमदार, एक खासदार यांचे वर्चस्व आहे. नगरपंचायतमध्ये प्रतिष्ठा अन् वर्चस्व प्राप्तीसाठी भारतीय जनता पार्टी मोठ्या ताकतीने प्रचारात लागली. तथापि, भाजपाच्या तुलनेत काँग्रेस व राकाँ हे दोन्ही पक्ष माघारल्याचे दिसून येत आहे. दरम्यान उद्या ३० रोजी प्रचारतोफा थंडावणार असल्याने प्रचाराचा वेग वाढला आहे.तुमसर विधानसभा मतदारसंघ भाजपाच्या हातात आहे. आमदार चरण वाघमारे मोहाडी - तुमसर तालुक्याचे नेतृत्व सांभाळीत आहेत. पंचायत समितीवर भाजपाची एक हाती सत्ता आहे. आता मोहाडीची नगरपंचायतवर भाजपाचे वर्चस्व सिद्ध व्हावे यासाठी सारी शक्ती आमदार चरण वाघमारे लावत आहेत. आमदार चरण वाघमारे यांना लहान मोठ्या निवडणुकांचा अनुभव आहे. या अनुभवाच्या भरवश्यावर मोहाडी नगरपंचायतवर भाजपाचा झेंडा फडकवू या आत्मविश्वासाने ते दिवसरात्र एक करीत आहे. क्षेत्राचा आमदार असल्याने त्यांच्याकडे स्थानिक मोहाडीत व बाहेर कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. निवडणुका कार्यकर्त्यांच्या भरवशावर जिंकता येतात याची जाणीव भाजपला आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते नगरपंचायत हातात यावी, यासाठी जोर लावून आहेत. प्रचारात अन् प्रचार सभेत भारतीय जनता पक्ष समोर आहे. भाजपाने नामदार चंद्रशेखर बावनकुळे, खासदार नाना पटोले, भाजपाचे प्रवक्ते दयाशंकर तिवारी, आमदार विकास कुंभारे, आमदार चरण वाघमारे, सभापती हरिश्चंद्र बंधाटे यांनी मोहाडीत प्रचारसभा घेतल्या आहेत. आमदार चरण वाघमारे स्थानिक भाजप कार्यकर्त्यांना हाताशी घेवून प्रभागात प्रचार सभेची धूम ठोकली. मात्र याउलट ज्या काँग्रेस पक्षाचे मोहाडी नगरपंचायत निवडणुकीत अनुकुल वातावरण तयार झाले असताना केवळ आमदार गोपाल अग्रवाल यांची एकच सभा झाली. काँग्रेस म्हणते, आम्हाला सभेची गरज नाही. आम्ही मतदारांकडे थेट जात आहोत. तोच आमचा प्रत्यक्ष प्रचार आहे. आज काँग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादीकडे मोठे नेते आहेत. पण राज्यसभेचे खासदार प्रफुल पटेल यांच्याशिवाय दुसरी सभा झालीच नाही. मोहाडीत इतिहास घडविण्यासाठी भाजपा ज्या पद्धतीने प्रचारात तुटून पडली आहे त्या मानाने काँग्रेस व राकाँचे कार्यकर्ते मागे पडल्याचे जाणवते. शिवसेनेकडून प्रचारात जिल्हा प्रमुख राधेश्याम गाढवे, राजेंद्र पटले, शिवसेनेचे तुमसर पं.स. चे उपसभापती शेखर कोतपल्लीवार, रामसिंग बैस यांनी मोहाडीत धूम सुरु केली. ३० आॅक्टोबरच्या सायंकाळी ५ वाजता प्रचाराची धुरळ थांबणार आहे. तथापि, लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पं.स. यांच्या निवडणुकीपेक्षा अधिक वेळ नगरपंचायतच्या निवडणुकीला प्रचारासाठी मिळाली राजकीय पक्षांच्या उमेदवारांना तर तब्बल बारा दिवस प्रचारासाठी मिळाले. प्रभागाची परिसीमा व मतदारसंख्या छोटी असल्यामुळे प्रचार करण्यास खूप वेळ मिळाली. पण प्रचाराला अल्पावधी पाहिजे होता. असे उमेदवारांकडून बोलले जात आहे. जेवढा प्रचाराच्या काळाची सीमा अधिक होता. त्याच्या तुलनेत पैसाही खूप मोठ्या प्रमाणावर झाल्याची प्रतिक्रिया दिसून आली. ३० तारखेनंतर प्रत्यक्ष प्रचार बंद होत असला तरी ३० ची रात्र व ३१ ची रात्र उमेदवारांची असते. शेवटच्या रात्रीच निवडणूक जिंकता येवू शकते. हा भरवसा अनेकांनी अनुभवला. पण, त्याची चर्चा फारसी होत नाही. मतदानाच्या आदल्या रात्री ‘अर्थ’कारणावर कोण आघाडी घेतो यावर २ नोव्हेंबरला मिळणाऱ्या निकालात दिसून येणार आहे. पण ही नगरपंचायतची निवडणूक भाजपाने प्रतिष्ठेची बनविली आहे. तसेच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने दम खम ठोकून नगरपंचायतवर झेंडा फडकावयायचाच या उद्दीष्टाने प्रेरित झाली आहे. २ नोव्हेंबरला कोणत्या पक्षाचा गुलाल अधिक उडतो याची आता प्रतीक्षा करावी लागणार आहे.
नगरपंचायत निवडणूक प्रचारतोफा आज थंडावणार
By admin | Updated: October 30, 2015 00:50 IST