मोहाडी : कोविड - १९च्या गंभीर काळात रास्त भाव दुकानदारांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचे धान्य वितरीत केले. जिल्हा प्रशासनाकडे पैसा येऊनही दुकानदारांना देय असलेली मार्जिनच्या फरकाची रक्कम मिळाली नाही. खात्यात पैसा वळता केला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
कोरोना विषाणूचा गत वर्षीचा तो काळ थरकाप आणणारा होता. अशा भयंकर काळात दुकानदारांनी मोठ्या हिमतीने धान्य वाटप केले होते. धान्य वाटपाच्या वेळी जिल्ह्यातील रास्त भाव दुकानदारांना कोरोनाने कवटाळले होते. त्यात काहींचा मृत्यू झाला तर काहींना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला होता. कोरोना योद्धा म्हणून प्रशासनाने याची साधी दखल घेतली नाही. अशा बिकट परिस्थितीत रास्त भाव दुकानदारांनी धोका पत्करून पात्र लाभार्थ्यांना धान्य वाटप केले. रास्त भाव दुकानदारांना १० रुपये १५० प्रतिक्विंटलप्रमाणे एप्रिल ते जूनपर्यंत मार्जिनच्या फरकाची रक्कम मिळाली. मात्र, जुलै- सप्टेंबर २०२० या महिन्यात वाटप केलेल्या धान्य मार्जिनच्या फरकाची देय रक्कम मंजूर होऊनसुद्धा अजूनपर्यंत रास्त भाव दुकानदारांच्या खात्यात वळती करण्यात आली नाही. तसेच ऑक्टोबर व नोव्हेंबर या महिन्यात धान्य
वाटप केलेली मार्जिन फरकाची रक्कम शासनाने मंजूर केलेली नाही. जिल्हा प्रशासनाकडे वित्तीय सल्लागार व उपसचिव अभय धांडे यांनी २ नोव्हेंबर २०२०ला ४२ जिल्ह्यांना अनुदान उपलब्ध करून दिले. भंडारा जिल्ह्यालाही अनुदान प्राप्त झाला. तथापि, चार महिने उलटूनही पैसा जिल्हा स्तरावर पडून आहे. यासंदर्भात सरकारी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष अरविंद कारेमोरे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. पण, जिल्हा प्रशासनाने प्रतिसाद दिला नाही. मार्चपूर्वी स्वस्त धान्य दुकानदारांच्या खात्यात पैसे पाठविले गेले नाही तर तो पैसा परत जाणार असल्याची भीती रास्त भाव दुकानदारांनी व्यक्त केली आहे. रास्त भाव दुकानदारांच्या बँक खात्यात तातडीने पैसा वळता केला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा सरकारी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने दिला आहे.
बॉक्स
दुकानदारांचे आर्थिक शोषण
कंत्राटदारांना स्वस्त धान्य दुकानात मोफत पोहचवून देणे, व्यवस्थित पोती लावून देणे, हे काम त्यांच्याकडे होते. मात्र, धान्य उचलायची हमाली प्रत्येक दुकानदाराकडून ५ ते ६ रुपये एका कट्ट्यावर वसुली करण्यात आल्याचे दुकानदारांनी सांगितले.
कोट
जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे मार्जिनच्या फरकाची रक्कम येऊन पडली आहे. दुकानदारांच्या बँक खात्यात पैसे वळते करण्यासाठी कशाची प्रतीक्षा करीत आहेत . आर्थिक देवाणघेवाण करण्यासाठी विलंब होत असल्याची शंका बळावत आहे.
अरविंद कारेमोरे
अध्यक्ष, जिल्हा सरकारी स्वस्त धान्य दुकानदार संघटना
कोट
मार्जिन फरकाचे अनुदान आले आहे. त्या अनुदानाची रक्कम तहसीलदार यांच्याकडे वळती करण्यात आली आहे.
अनिल बंसोड
जिल्हा पुरवठा अधिकारी
कोट
जुलै- सप्टेंबर या महिन्यात वाटप केलेल्या धान्य मार्जिनच्या फरकाचे अनुदान अजूनही तहसीलदार यांच्या हेडला आले नाही. दोन दिवसांपूर्वी पत्र आले. पण, अनुदान अप्राप्त आहे.
सागर बावरे
अन्न पुरवठा निरीक्षक, मोहाडी