संजय साठवणे - साकोली
तालुक्यातील पिंडकेपार येथील एका डॉक्टरच्या दवाखान्यात अल्पवयीन मुलीचा गर्भपात करतानी जीव गेला. याला जबाबदार कोण? प्रशासन, ती मुलगी, तिचे आईवडील, डॉक्टर की पैसा. याचे उत्तर अनुत्तरीत असले तरी बाळबुद्धे याने पैसे कमावण्यासाठीच अनधिकृतपणे हा गोरखधंदा पैशासाठी केला यात शंका नाही. या प्रकरणी प्रशासनाने चौकशी करुन बाळबुद्धेवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरीकांनी केली आहे. या अल्पवयीन मुलीला तिच्या मामानेच येथे गर्भपात करण्याकरीता आणले. या दरम्यान तिचा मृत्यू झाला. दृश्य पाहताच मामा पसार झाला. पोलिसांनी अवघ्या बारा तासांच्या आत मामाला शोधून काढले. यात पोलिसांचे कौतुकही केले पाहिजे. शासनाने गर्भपात करण्यावर कडक बंधने घातली. गर्भपात करण्यासाठी ठोस कारण असल्यास ते गर्भपात सरकारमान्य गर्भपात केंद्रात केल्या जातात. मात्र पिंडकेपार येथील बाळबुद्धे यांच्याजवळ असा कुठलाही परवाना नाही. तरी त्याने एवढी मोठी हिंमत कशी काय केली. याचाच अर्थ असा की यापूर्वीही बाळबुद्धे याने असे अनेक गर्भपात केले असावे, अशी चर्चा गावात आहे. याचाही तपास पोलिसांनी घेतला पाहिजे. शासनातर्फे जननी सुरक्षा योजना सुरू केली. यात शासनातर्फे गर्भवती मातेकरीता होणार्या बाळाकरीता विविध उपाययोजना व सोयीसुविधा उपलब्ध करण्याकरीता कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला. महिलांवरील अत्याचार थांबविण्यासाठी व महिलांना न्याय मिळण्यासाठी अनेक कठोर कायद्याची तरतूद केली आहे. तरीही पुरुषप्रधान संस्कृतीत महिला सुरक्षीत नाहीत. हे या प्रकरणावरुन प्रामुख्याने जाणवते. बाळबुद्धे हा अशा प्रकारचा गोरखधंदा बर्याच दिवसापासून चालवित असल्याची तक्रार गावकर्यांनी प्रशासनातर्फे याआधीच केली. या तक्रारीची दखल अधिकार्यांनी फक्त कागदोपत्री घेतली. त्याचवेळी या बाळबुद्धेवर कार्यवाही झाली असती तर आज एका अल्पवयीन मुलीचा जीव वाचला असता. आताही वेळ गेली नाही. प्रशासनाने प्रामाणिकपणे या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी जेणेकरुन यापुढे असे प्रकार घडू नये.