पर्यटकांची गर्दी : पक्षीमित्रांसाठी अभ्यासाची पर्वणी पवनी : थंड प्रदेशातून हिवाळ्यात गोसीखुर्द धरणावर आलेले पाहुणे स्थलांतरीत पक्षी आता हळूहळू आपल्या मायभुमीकडे परतण्याच्या वाटेवर आहेत. आता या स्थलांतर पक्ष्यांच्या येण्याची वाट पुढच्या हिवाळयातच पाहावी लागणार आहे.गोसीखुर्द धरण तयार होण्यापुर्वी गोसीखुर्द परिसरात वैनगंगा नदीवर हिवाळ्याच्या दिवसात मोठया प्रमाणात स्थलांतरीत पक्षी सैबेरीया, मंगोलीया, लडाख, चीन आदी देशातून येत होते. पण या स्थलांतरीत पक्षांच्या मोठ्या प्रमाणात शिकारी होत असल्यामुळे येथे येणाऱ्या पक्ष्यांच्या मोठ्या संख्येत दरवर्षी घट होऊ लागली व येथे फारच कमी प्रमाणात म्हणजे नगण्यच पक्षी येत होते.पण विदर्भातील सर्वात मोठे गोसीखुर्द धरण तयार झाले आहे. या धरणात मोठ्या प्रमाणात जलसाठा आहे. परिणामी जिकडे-तिकडे चारही बाजूने अथांग पाणी पसरल्यामुळे येथे पक्ष्यांना वास्तव्य करणे सोईचे ठरु लागले. येथे मोठ्या प्रमाणातील पक्ष्यांनी आपली घरटी बांधली आहेत. दोन-तीन वर्षापासून येथे विदेशातील स्थलांतरित पक्षी आढळून आले आहेत. या वर्षी येथे हिवाळ्यातील स्पॉट बिल्ड डक चे या स्थलांतरित पक्ष्यांचे थवे आले होते. या स्पॉट बिल्ड डक शिवाय अन्य बहुसंख्य पक्षी ही येथे आढळून आले होते. पण उन्हाळा सुरु झाल्यामुळे या स्थलांतरित पक्ष्यांनी आता आपल्या मायभुमीकडे परतने सुरु केले आहे.गोसीखुर्द धरण विदर्भातील चांगले पर्यटनस्थळ म्हणून उदयास येत आहे. दररोज येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देतात. हिवाळ्याच्या दिवसात येणारे स्थलांतरीत पक्षी वाढल्यास गोसीखुर्द धरण पक्षीमित्रांसाठी अभ्यासाची पर्वणीच ठरणार असल्याने, त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.पण त्याकरिता या पक्षांच्या शिकारीवर कडक निर्बंध आणून या पक्ष्यांना वाचविणे महत्वाचे आहे. त्यामुळे या पक्ष्यांना येथे स्वछंद विहार करता येईल. त्यामुळे पुढच्या वर्षी येथे येणाऱ्या पक्ष्यांच्या संख्येत वाढ होईल. (शहर प्रतिनिधी)
गोसीखुर्द धरणातील स्थलांतरित पक्षी परतीच्या वाटेवर
By admin | Updated: April 25, 2015 00:41 IST