भदन्त संघरत्न माणके : विश्वशांतीसाठी संगितीचे आयोजन पवनी : अनेक अवयव मिळून शरीर तयार होते. यामध्ये शरीराच्या प्रत्येक अवयवाला जसे महत्व आहे, तसे सर्वच धर्म हे विश्वशांतीचे अवयव असून प्रत्येकाला सारखे महत्व आहे. यातून जगाला मैत्रीचा संदेश दिल्या जातो म्हणून महासमाधीभूमी संगीती या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, असे प्रतिपादन पय्या मेत्ता संघाचे अध्यक्ष भदन्त संघरत्न माणके यांनी व्यक्त केले. ते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानाहून बोलत होते.भदन्त माणके म्हणाले, संपूर्ण देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १२५ वी जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात येत आहे. हा जयंती उत्सव केवळ मिरवणूका यासाठी नसून बाबासाहेबांच्या विचारांवर चिंतन करण्यासाठी आहे. बाबासाहेबांनी स्वत:च्या कुटूंबापेक्षा अनेक कुटूंबियांच्या हितांना महत्व दिले. याची कारणे आपण स्वत: मध्ये शोधली पाहिजेत, असा सल्ला भदन्त संघरत्न माणके यांनी दिला. महासमाधीभूमी रुयाळ (सिंदपूरी) येथे पय्या मेत्ता संघ बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर १२५ वी जयंती महोत्सव समितीद्वारा महासमाधीभूमी संगीती या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथे सर्वधर्माच्या प्रार्थना देण्यासाठी सर्व धर्मिय धर्मगुरुंना निमंत्रित करण्यात आले. यामध्ये बौध्द धमार्चे भदन्त संघरत्न माणके, भदन्त सदानंद महास्थवीर, ख्रिश्चन धमार्चे रोशन मिश्रा, हिंदू धमार्चे नरेश परमानंदजी, मुस्लीम धमार्चे मौलाना शौकत साहब, शिख धमार्चे प्रकाशसिंगजी, गुरुदेव सेवा मंडळाचे ज्ञानेश्वरजी रक्षक यांचा समावेश होता. उपस्थितांनी धमार्ची प्रार्थना देवून मनोगतातून एकतेमधून विश्वशांतीचा संदेश दिला. कार्यक्रमाचे उदघाटन भदन्त सदानंद महास्थवीर यांनी तर कार्यक्रमाची अध्यक्षता धम्मदूत भदन्त संघरत्न माणके यांनी भूषविली. विशेष अतिथी म्हणून आमदार रामचंद्र अवसरे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे, माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन पंचभाई, काँगेसचे ज्येष्ठ नेते अशफाकभाई पटेल उपस्थित होते. कार्यक्रमात बाबासाहेबांच्या विविध विषयातील दृष्टीक्षेपावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टीत पाली भाषेचे महत्व, महिला चळवळ, विधी व न्याय, संतांचा प्रभाव, सामाजिक कार्य, पत्रकारिता, बौध्द संस्कृती, मुलनिवासी, विद्यार्थी, युवक व समता सैनिक दल या विषयांचा समावेश होता. यात वक्ते म्हणून प्रा.निलिमा चव्हाण, अॅड. वसंत खापर्डे, ज्ञानेश्वर रक्षक, मिलींद फुलझेले, सत्यजित चंद्रीकापूरे, सखाराम झोडे यांनी सहभाग घेतला. यावेळी उपस्थित धर्मगुरुंचा तथा अतिथींचा प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन अॅड.महेंद्र गोस्वामी, धम्मानंद मेश्राम,अरविंद धारगावे, जयराज नाईक, यांनी तर आभार प्रदर्शन मनोहर मेश्राम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धम्मानंद मेश्राम,अरविंद धारगावे, शिलमंजू सिंव्हगडे, ?ड. महेंद्र गोस्वामी, मनोहर मेश्राम, अचल मेश्राम, अरुण गोडांणे, भारत वासनिक, ?ड. गौतम उके, जयराज नाईक इत्यादींनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)
प्रत्येक धर्म देतो मैत्रीचा संदेश
By admin | Updated: May 17, 2016 00:21 IST