मोहाडी : शिक्षणाने व्यक्ती मोठा होतो. शिक्षणापेक्षा मोठी संपत्ती कोणतीच नाही. विद्यार्थ्यांने वर्गात शिकविताना लक्ष द्यावे. दिवसभरात शाळेत काय शिकविले गेले, आपण काय केले याचे चिंतन व मनन रात्री बिछाण्यावर गेल्यावर प्रत्येकाने करावे. या चिंतन व मननाने रात्री शांत झोप लागते, असे प्रतिपादन उपशिक्षणाधिकारी संजय आयलवार यांनी व्यक्त केले.मोहगाव देवी येथील महात्मा जोतिबा फुले शाळेला उपशिक्षणाधिकारी आयलवार यांनी भेट दिली. यावेळी आयलवार यांना विद्यार्थ्यांशी बोलण्यावाचून राहता आले नाही. त्यांनी नवीन प्रवेशित आठव्या वर्गात प्रवेश केला. विद्यार्थ्यांनी उपशिक्षणाधिकारी यांची कसे आहात सर असे बोलून प्रेमाने मन जिंकले. शिक्षकातून अनेकांना घडविणाऱ्या आयलवार यांनी विद्यार्थ्यांशी चर्चात्मक हितगूज केली. विद्यार्थीही मनमोकळेपणाने बोलले. विद्यार्थिदशेत खूप अभ्यास करा, खेळा, मोठे स्वप्न बघा, मोठे व्हा अशा विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तत्पूर्वी उपशिक्षणाधिकारी यांनी मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांची सभा घेतली. शाळेत उद्भवणाऱ्या समस्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ कशी करता येईल आदी विषयांवर विस्तृत चर्चा झाली. यावेळी मुख्याध्यापक राजकुमार बांते, सहायक शिक्षक डी. एम. वैद्य, हंसराज भडके, हेमराज राऊत, गजानन वैद्य, शोभा कोचे, शिक्षकेत्तर कर्मचारी लीलाधर लेंडे, मोहन वाघमारे, श्रीहरी पडोळे उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
शांत झोपेसाठी रात्री मनन, चिंतन करा
By admin | Updated: July 25, 2015 01:24 IST