पायाला व डोक्याला जखमा : जंगलात सोडण्याच्या आदेशाची प्रतीक्षासाकोली : तालुक्यातील जांभळी (खांबा) येथील एका वृद्ध महिलेचा बळी घेणारा बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकला. त्यानंतर या बिबट्याला गडेगाव लाकूड आगारात ठेवण्यात आले आहे. पिंजऱ्यात बंदीस्त असलेला बिबट्या बाहेर पडण्यासाठी धडपडत आहे. यातच डोके पिंजऱ्याला आपटत असल्यामुळे हा बिबट्या जखमी झाला आहे.या बिबट्याच्या डोक्याला व पायाला जखमा असून गडेगाव आगारात वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीत आहे. या बिबट्याला कोणत्या जंगलात सोडायचे असा पेच वनअधिकाऱ्यांना पडला आहे.साकोली तालुक्यातील जांभळी खांबा येथे दि.१ नोव्हेंबर रोजी या बिबट्याने मळाबाई बावने या घराच्या पडवीतून फरफटत नेले होते. त्यानंतर या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरे लावले होते. दि.५ च्या रात्री हा बिबट्या पिंजऱ्यात अडकला. त्यानंतर त्याला गडेगाव आगार येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या देखरेखीत ठेवण्यात आले. तेव्हापासून हा बिबट गडेगाव येथे आहे. १४ दिवसापासून हा बिबट पिंजऱ्यात असून बाहेर पडण्यासाठी पिंजऱ्याच्या सळाखींना डोके आपटतो. त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे. या बिबट्याला जंगलात सोडण्यासाठी वनविभागाने मुख्य वनसंरक्षक वन्यजीव नागपूर यांना प्रस्ताव पाठविला आहे. मात्र अजूनपर्यंत कोणतेही आदेश आले नाही. त्यामुळे या बिबट्या वनविभागाच्या देखरेखीत आहे.जंगलात सोडायचे की पिंजऱ्यात ठेवायचेया बिबट्याने एका महिलेला ठार केल्यामुळे या बिबट्याला जंगलात सोडणे सोयीस्कर ठरेल की नवेगावबांध, नागपूर येथील महाराजबागेतील पिंजऱ्यात ठेवायचे यावर वनविभागात मंथन सुरू आहे. त्यामुळे या बिबट्याला सोडण्यासाठी देण्यात येणाऱ्या आदेशासाठी विलंब होत आहे.यासंदर्भात साकोलीचे सहायक वनसंरक्षक पटले यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, या बिबट्यावर गडेगाव येथे औषधोपचार सुरू असून सध्या तो वनविभागाच्या निगराणीत आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार या बिबट्याला योग्य त्या सुरक्षीत स्थळी सोडण्यात येईल, असे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (तालुका प्रतिनिधी)
जेरबंद बिबट पिंजऱ्यात जखमी
By admin | Updated: November 19, 2014 22:32 IST