पटेल महाविद्यालयात : मधुमेह व पक्षाघातावर कार्यशाळाभंडारा : मेंदूवरील आघाताचे विविध प्रकार व त्यामागील कारणे आहेत. मानवी शरीराला होणाऱ्या पक्षाघाताबद्दलच्या समाजात अनेक गैरसमजूती आहेत. त्यावर चर्चा करून व पक्षाघाताची लक्षणे दिसताच तातडीने उपचार करण्याचे महत्व डॉ.सचिन ढोमणे यांनी स्पष्ट केले. येथील जे.एम. पटेल महाविद्यालयात कर्मचारी विकास कार्यक्रमाअंतर्गत मधुमेह व पक्षाघातावर एक कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेला प्राचार्य डॉ.विकास ढोमणे, प्रसिद्ध मधुमेहतज्ञ डॉ. सुनिल अंबुलकर, मज्जाशास्त्रज्ञ डॉ. सचिन ढोमणे, डॉ. अमोल पदवाड आदी उपस्थित होते. आरोग्य सुरक्षा व व्यवस्थापन यासाठी शास्त्रीय माहिती मिळावी व जागरूकता कर्मचाऱ्यांमध्ये वाढावी या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.प्रथम सत्रात स्लाईड व चित्रफितींच्या सहाय्याने सादरीकरण करून डॉ. सचिन ढोमणे यांनी पक्षाघाताच्या लक्षणांसाठी ‘फास्ट’ हा मंत्र समजावून सांगितला. चेहरा वाकडा होणे, हात उचलता न येणे, बोलण्यात अडखळणे यापैकी काही दिसल्यास वेळ न घालवता तातडीने उपचार करणे आवश्यक आहे. मेंदूच्या विविध समस्यांवर उपचार करण्याची अत्यंत नवनवीन तंत्रे विकसित झाली असून मेंदूला न उघडताही रक्तवाहिन्यांतून सूक्ष्म उपकरणे टाकून मेंदूपर्यंत पोहोचणे व रक्ताच्या गाठी काढणे आता शक्य झाले आहे. हृदयविकाराचा झटका आल्यावर जितक्या त्वरेने आपण धावपळ करतो तशीच धावपळ पक्षाघाताची लक्षणे दिसताच केली तर रुग्ण संपूर्ण बरा होऊ शकतो, असेही डॉ. ढोमणे म्हणाले. द्वितीय सत्रात डॉ. अंबुलकर यांनी मधुमेहाची कारणे व उपाय यावर निस्तृत मार्गदर्शन केले. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले, नियमित व्यायाम आणि संतुलीत आहार हाच मधुमेहावर नियंत्रण ठेवण्याचा सोपा मार्ग आहे. यावर त्यांनी विशेष भर दिला. आजची जीवनशैली मधुमेहाला नियंत्रण देणारी आहे. त्यामुळे वयाच्या चाळीशीनंतर प्रत्येकाने वर्षातून एकदातरी रक्तातील साखर, ‘कोलेस्ट्रॉल इत्यादींची तपासणी करणे महत्वाचे आहे. आहारामध्ये कोणत्या प्रकारच्या तेलांचा वापर करावा कोणते पदार्थ टाळावे व खाण्याचे वेळापत्रक कसे असावे याबद्दलही डॉ. अंबुलकर यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी उपस्थितांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे देवून त्यांच्या शंकांचे समाधानही केले.कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे नॅक समन्वयक डॉ. अमोल पदवाड यांनी केले. कार्यशाळेला जे.एम. पटेल महाविद्यालय तसेच मनोहरभाई पटेल शिक्षण महाविद्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी डॉ.पदवाड, प्रा.डॉ.कार्तिेक पनिकर यांच्यासह महाविद्यालयाचे प्राध्यापक तथा शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)
पक्षाघाताबद्दल अनेक गैरसमजूती
By admin | Updated: April 23, 2015 00:21 IST