चुल्हाड (सिहोरा) : बपेरा, चुल्हाड आणि सिहोरा अशा तीन जिल्हा परिषद मतदार क्षेत्रातील शेत शिवारात चांदपूर जलाशयाचे पाणी वाटप करणाऱ्या मुख्य डाव्या कालव्यात गवत व झुडुपांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना थेट पाणी मिळत नसल्याने बोंबाबोंब सुरु झाली आहे.मध्यम प्रकल्प चांदपूर जलाशय अंतर्गत सिहोऱ्यात लघु पाटबंधारे विभाग अशी रचना करण्यात आली आहे. या विभागाला १४ हजार हेक्टर आर शेती ओलिताखाली आणण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या विभागात उजवा आणि डावा कालवा असे स्वतंत्र विभाग यंत्रणा नियुक्त करण्यात आली आहे. परंतु सध्यस्थितीत या विभागात रिकाम्या खुर्च्या आहेत. शाखा अभियंते हे महत्वपूर्ण पदे प्रभारी आहेत. यामुळे अन्य पदाची कल्पनाच न केलेली बरी. संपूर्ण विभाग प्रभारी असल्याचे चित्र आहे. डावा कालवा गेल्या तीन वर्षापासून उपेक्षित आहे. या विभागात यापुर्वी शाखा अभियंता पदावर अरविंद घोलपे कार्यरत होते. त्यांचे गडचिरोली जिल्ह्यात स्थानांतरण झाल्याने उजवा कालव्याचे शाखा अभियंता आनंद पप्पुलवार यांना प्रभार देण्यात आला असता कामांना गती मिळाली आहे. परंतु यानंतर शाखा अभियंता पप्पुलवार यांना पदोन्नती तथा सेवानिवृत्ती मिळाल्याने दोन्ही कालव्याचे शाखा अभियंता पदे रिक्त झाली आहे. सध्या ही दोन्ही कालवे प्रभारी खांद्यावर वाटचाल करीत आहेत. दरम्यान पाणी वाटप हंगाम आणि महिनाभरापूर्वी कालवे आणि नहर स्वच्छ केली जात असल्याची परंपरा आहे. शेतकऱ्यांचे शेतात थेट पाणी पोहचविण्यासाठी आधीच उपाययोजना केली जात असताना गेल्या दोन वर्षापासून या कामांना तिलांजली देण्यात आली आहे. यामुळे कालवे आणि नहराचे चित्र गवत आणि झुडुुपांनी फुगल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी नहर आणि पादचाऱ्यांना पाईप लावताना नियोजन चुकल्याने शेतकरी बोंबाबोंब करीत आहेत. यामुळे शेतकरी कार्यालयात हल्लाबोल आंदोलनाचा पवित्रा घेत आहेत. चतुर्थ गटातील तीन कर्मचारी सध्या स्थित कर्तव्य बजावत आहेत. त्यांनी सेवानिवृत्तीचे उंबरठे गाठली असून एप्रिल महिन्यात त्यांची सेवा बंद होणार आहे. कालवे, नहर आणि पादचाऱ्यांचे चित्र व समस्यांची माहिती त्यांनी वरिष्ठांना दिली आहे. अनेक नहरांचे खोलीकरण झाले नसल्याने सपाटीकरणाची अवस्था आहे. कर्कापूर, रेंगेपार, शिवारात असे नहर दिसून येत आहेत. यामुळे टेलवर पाणी पोहचत नसल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे. या कालवे आणि नहराची वाईट अवस्था रब्बी हंगामातही हाय टेंशन वाढविणारी ठरणार आहे. मोहगाव (खदान) गाव शिवारात नहर झुडूपांनी दिसेनासा झाला आहे. झुडूप वाढल्याने पाण्याची अडवणूक होत आहे. यातच डावा कालवा पूर्णत: दुर्लक्षित झाल्याने शेतकऱ्यांना संकटाचा सामना करावा लागणार आहे. कालवे आणि नहरांचे सिमेंट अस्तरीकरण वाहून गेले आहे. निकृष्ट आऊटलेट कोसळण्याच्या मार्गावर आली. यामुळे पाणी वाटप अडचणीत येणार असल्याने नहराच्या विकासाकरिता ६० कोटींच्या पॅकेजची गरज असल्याचे जाणकारांचे मत आहे. (वार्ताहर)
मुख्य डाव्या कालव्यात झुडपी जंगल
By admin | Updated: September 21, 2015 00:32 IST