Maharashtra Election 2019 ; जिल्ह्यात ७० उमेदवारांचे नामांकन दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 06:00 AM2019-10-05T06:00:00+5:302019-10-05T06:00:42+5:30

साकोली येथे भाजपचे उमेदवार डॉ. परिणय फुके यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत नामांकन दाखल केले. मंगलमुर्ती सभागृहापासून काढण्यात आलेल्या खासदार सुनील मेंढे यांच्यासह रॅलीत हजारो समर्थक सहभागी झाले होते. माजी खासदार नाना पटोले यांनी काँग्रेसतर्फे नामांकन दाखल केले.

Maharashtra Election 2019 ; Nominations of 3 candidates were registered in the district | Maharashtra Election 2019 ; जिल्ह्यात ७० उमेदवारांचे नामांकन दाखल

Maharashtra Election 2019 ; जिल्ह्यात ७० उमेदवारांचे नामांकन दाखल

Next
ठळक मुद्देभंडारा, तुमसर, साकोली मतदारसंघ : परिणय फुके, नाना पटोले, राजू कारेमोरे, अरविंद भालाधरे यांची उमेदवारी

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा/साकोली/तुमसर : जिल्ह्यातील तुमसर, भंडारा आणि साकोली विधानसभा मतदारसंघात नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ७० उमेदवारांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे. तुमसर विधानसभेसाठी १६, भंडारा २६ आणि साकोली मतदारसंघात २८ उमेदवारांनी नामांकन दाखल केले. तीनही मतदारसंघात बंडखोरीची शक्यता असून उमेदवारी मागे घेण्याच्या दिवशी या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. उमेदवारांनी रॅली काढून शक्तीप्रदर्शन करीत नामांकन दाखल केले.
तुमसरमध्ये १६ उमेदवारांनी नामांकन दाखल केले असून त्यात भाजपचे प्रदीप पडोळे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजू कारेमोरे यांच्यासह अपक्ष आमदार चरण वाघमारे, माजी आमदार अनिल बावनकर, डॉ. पंकज कारेमोरे आदींचा समावेश आहे. भंडारा येथे आघाडीच्या पिरिपा कवाडे गटाचे जयदीप कवाडे, महायुतीच्या रिपाइं आठवले गटाचे अरविंद भालाधरे यांच्यासह अपक्ष आमदार रामचंद्र अवसरे, माजी आमदार नरेंद्र भोंडेकर आदी २६ उमेदवारांनी नामांकन दाखल केले. भंडारामध्ये महायुतीच्या आठवले गटाचे अरविंद भालाधरे यांनी साखरकर सभागृहापासून शक्तीप्रदर्शन करीत रॅली काढली.
साकोली येथे भाजपचे उमेदवार डॉ. परिणय फुके यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत नामांकन दाखल केले. मंगलमुर्ती सभागृहापासून काढण्यात आलेल्या खासदार सुनील मेंढे यांच्यासह रॅलीत हजारो समर्थक सहभागी झाले होते. माजी खासदार नाना पटोले यांनी काँग्रेसतर्फे नामांकन दाखल केले. तत्पूर्वी लहरीबाबा मठात सभा घेण्यात आली. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. बहुजन वंचित आघाडीतर्फे काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये यांनी आपले नामांकन दाखल केले. साकोली विधानसभा मतदारसंघात तिहेरी लढतीची शक्यता निर्माण झाली आहे.

आज अर्जांची छाननी
जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघातून ७० उमेदवारांनी १०९ नामांकन अर्ज दाखल केले आहे. या अर्जाची छाननी शनिवारी ५ आॅक्टोबर रोजी होणार आहे. तर नामांकन अर्ज दाखल मागे घेण्याची अंतिम तारीख ७ आॅक्टोबर आहे. यानंतरच तीनही विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

तुमसर, भंडारा, साकोलीत बंडखोरीची शक्यता
जिल्ह्यातील तुमसर, भंडारा आणि साकोली तीनही मतदारसंघात बंडखोरी होणार असल्याचे चित्र नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दिसून आले. भंडारा विधानसभा मतदारसंघातून भाजपने तिकीट कापल्याने आमदार रामचंद्र अवसरे यांनी आपले नामांकन दाखल केले. तर भंडारा या अनुसूचित जातीच्या मतदारसंघावर शिवसेनेचा दावा असतानाही महायुतीत ही जागा रिपाईच्या कवाडे गटाला गेली. त्यामुळे शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. आता नामांकन अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी चित्र स्पष्ट होणार आहे. तुमसर विधानसभा क्षेत्रातही बंडखोरीची दाट शक्यता आहे. विद्यमान आमदार चरण वाघमारे यांचे तिकीट ऐन वेळेवर कापल्याने त्यांनी बंडखोरी करीत शेवटच्या दिवशी नामांकन दाखल केले. त्यांच्या भूमिकेकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागले आहे. काँग्रेसचे डॉ. पंकज कारेमोरे, राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिल बावनकर आणि राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष योगेश सिंगनजुडे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल करून बंडखोरी केल्याचे सध्यातरी दिसत आहे. साकोली विधानसभा मतदार संघात काँग्रेसमध्ये बंडखोरीची शक्यता आहे. गत काही दिवसांपासून तिकीटासाठी प्रयत्न करणारे माजी आमदार सेवक वाघाये यांना अखेर बंडाचा झेंडा हाती घेतला. वंचित बहुजन आघाडीतर्फे त्यांनी निवडणुकीत उडी घेतली आहे. जिल्ह्यातील तीनही मतदारसंघात सध्या बंडखोरीचे चिन्हे दिसत असले तरी येत्या ७ आॅक्टोबर रोजी नामांकन मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी चित्र स्पष्ट होणार आहे. पक्षश्रेष्ठी बंडखोरांची मनधरनी करून त्यांचे बंड शमविण्याची शक्यता आहे. मात्र साकोली, भंडारा आणि तुमसर मतदारसंघात तिरंगी लढत होणार हे निश्चित.

Web Title: Maharashtra Election 2019 ; Nominations of 3 candidates were registered in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.