एकीचे बळ: वैनगंगेची स्वच्छता कोण करणार?,सेवाभावी संस्थेच्या मदतीने परिसर होणार सुसज्ज मोहन भोयर तुमसर बारमाही वाहणारी वैनगंगा नदी असल्याने माडगी (देव्हाडी) येथे तालुक्यातील सर्वात मोठे स्मशानघाट आहे. या स्मशानघाटावर मूलभूत सोयी सुविधा नाहीत. उलट अस्वच्छतेने कळस गाठले होते. संत गाडगेबाबांनी स्वच्छतेचे व्रत घेतले होते. त्यांचा वसा पुढे नेण्याकरिता माडगी येथील जिल्हा परिषद सदस्यासह एका पथकाने वैनगंगा नदी काठावरील स्मशानघाट स्वच्छ केला. याकरिता एक समितीही स्थापन करण्यात आली. शासकीय अनुदानातून देशात गंगा स्वच्छ अभियान सुरु आहे. तर येथे वैनगंगा स्वच्छतेकरिता ग्रामस्थ एकवटले आहे हे विशेष.विदर्भाची मिनी पंढरी म्हणून माडगी (दे.) हे तिर्थस्थळ प्रसिद्ध आहे. गोंदिया तुमसर राज्यमार्ग तथा मुंबई हावडा रेल्वे मार्गावर हे पवित्र स्थळ असूनही अनेक वर्षापासून उपेक्षित आहे. विस्तीर्ण नदीपात्र ये जा करिता सोयीचे असे स्थळ, पौराणिक महत्व या स्थळाला आहे. तुमसर तालुक्यातील सर्वात मोठे स्मशानघाट म्हणून याची ओळख आहे. तुमसर शहर व परिसरातील सुमारे २० ते २२ गावे या स्मशानघाटावर अंत्यसंस्कार करण्याकरिता येतात. या स्मशानघाटावर अंत्यविधी पार पाडल्यानंतर उरलेले साहित्य, लाकडे, काही प्रमाणात राख तशीच पडून राहते. सर्वसाधारण दरदिवशी एक याप्रमाणे येथे अंत्यसंस्कार होतात. परंतु स्वच्छता करण्याकरतिा कुणीच नाही. त्यामुळे येथे अस्वच्छतेने कळस गाठला होता. या क्षेत्राचे जि.प. सदस्य के.के. पंचबुद्धे यांनी पुढाकार घेवून संपूर्ण माडगी स्मशानघाट व परिसर स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला. याबाबत गावातील ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, युवक महिला मंडळाशी चर्चा केली. संत गाडगेबाबा यांच्या स्वच्छतेचा वसा आपणही पुढे चालविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्या अनुषंगाने सर्व मंडळी कामाला लागली. पाहता पाहता वैनगंगा नदी घाटावरील स्मशानघाट स्वच्छ झाला. एकीचे बळ प्रोत्साहनामुळे गावकरी कशी किमया करू शकतात, हे यावरून सिद्ध होते.स्मशानघाट परिसर एका सेवाभावी संस्थेच्या मदतीने सुसज्ज करण्यात येणार असल्याची माहिती के.के. पंचबुद्धे यांनी दिली. या स्वच्छता मोहिमेत माडगीचे उपसरपंच फुकटू हिंगे, के.सी. वहीले, व्यसनमुक्तीचे अध्यक्ष बोधानंद रोडगे गुरुजी, मानवाधिकार समितीचे तालुका प्रमुख श्रीराम चवरे, अमृत बुद्धे, स्नेहल रोडगे, वनिता पंचबुद्धे, किरण हिंगे, गौरव पंचबुद्धे, कैलाश सिंगाडे, कारू बोंदरे, दसाराम कांबळे, ज्ञानेश्वर नवदेवे, दिपक कांबळे, गणेश कांबळे, जीवन कांबळे, शक्ती कांबळे, अंतकला कांबळेसह गावातील युवक, महिला मंडळ, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
स्मशानघाट स्वच्छतेसाठी माडगी ग्रामस्थ सरसावले
By admin | Updated: June 12, 2016 00:23 IST