चांदवासकर यांचे प्रतिपादन : श्रीराम मंदिरात रामायणावर चर्चासत्रजवाहरनगर : प्रभू रामचंद्राच्या जीवनात पशू व पक्ष्यांचेही महान योगदान आहे. जटायु व संपाती ह्यांनी सीता-मातेसाठी रावणासोबत केलेला संघर्ष ही फार मोठी घटना आहे. राम व लक्ष्मणाची सर्पबंधनातून सुटकाही गरुडाने केली. रामभक्त हनुमान, राजा सुग्रीव अंगद ह्यांचे योगदान अतुलनीय असल्याचे प्रतिपादन हेमंत चंदनवासकर यांनी केले. अस्वल जांबुवंतामुळेच समुद्रसेतु बांधता आला. त्या चिमुकल्या खारोटीचे योगदान फार मनोरंजक आहे. सुवर्णमृगामुळेच सीताहरण झाले. व अश्वमेघ यज्ञामुळे लवकुश यांचे युध्द झाले. मावन जीवनात पशु व पक्षी ह्याचे अनन्य साधारण महत्व आहे. असे अत्यंत माहितीपूर्ण भाषण हेमंत चंदवासकर यांनी श्रीराम मंदिर जवाहरनगर येथे दिले. ते श्रीराम मंडळ व ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आयोजित तुळशीवक्ता म्हणून संबोधन करीत होते. ज्यांनी रामायणातील अनेक उपेक्षित प्रसंगाची चर्चा करुन रसिक श्रोत्यांचे मनोरंजन केले.प्रारंभी हेमंत व विवेक पाठक, दिनेश वसाणी व डॉ. गुप्ता ह्यांनी राम दरबार व गोस्वामी तुलसीदास ह्यांच्या प्रतिमेस माल्यार्पण केले. रामायण मंडळाच्या ह्या ४९ व्या कार्यक्रमास अध्यक्ष तुकाराम शाहू ह्यांनी सुमधूर स्वरात तुलसी-वंदना गाऊन भावपूर्ण सुरुवात केली. संस्थापक डॉ. गुप्ता ह्यांनी दोन्ही वक्त्यांच्या परिचय करुन दिला.अध्यक्ष दिनेश वसाणी ह्यांच्या हस्ते मराठी संशोधनात्मक पुस्तक ‘मुलारंभ’ चे लेखक वसंत चन्ने ह्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर श्रीराम मंदिर ट्रस्टचे सचिव विवेक पाठक यांनी रामायणाच्या संदर्भात धार्मिक व नैतिक मूल्यांचे महत्व ह्या विषयावर हिंदीत सारगर्भीत भाषण दिले. त्यांनीरामाची मर्यादा, लक्ष्मणाचे व भरताचे बंधुप्रेम, हनुमंताची स्वामीभक्ती व शबरीचे निश्चल प्रेम ह्यांचा उल्लेख करुन उपस्थितांना आवाहन केले. ते म्हणाले आजच्या कलीयुगात ह्या उच्च मूल्यांचा अंगिकार करुनच आम्ही आदर्श समाजाची स्थापना करु शकतो. ज्येष्ठ नागरिक संघ जवाहरनगरचे अध्यक्ष दिनेश वसाणी ह्यांनी दोन्ही वक्त्यांचे सुंदर विचारासांठी हार्दिक आभार मानले.सर्व उपस्थितांना आवाहन केले कि कमीत कमी आठवड्यातून एकदा तरी घरी सर्वांनी सामुहिक रामायण पाठ करुन कुटूंबाची संस्कृती जपावी.श्रीराम रामायण मंडळाचे संस्थापक डॉ. चंद्रमोहन गुप्ता ह्यांनी कार्यक्रमाचे संचालन केले व घोषणा केली की, पुढील वर्षी कार्यक्रमाच्या सुवर्ण जयंतीनिमित्त तीन दिवसांचा भव्य सोहळा संपन्न करण्यात येईल. सुशिल देशमुख यांनी मंडळाचे अहवाल वाचन केले व सचिव वसंत देशमुख ह्यानी सर्वांचे आभार मानले. याप्रसंगी जवाहरनगर परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भजन गायक गणेशप्रसाद ठाकुर व पं. श्यामकांत जोशी ह्यांनी आरती केली. कार्यक्रमाची सांगता महाप्रसाद वितरणाने करण्यात आली. (वार्ताहर)
प्रभू रामाच्या जीवनात पशू-पक्षांचेही महान योगदान
By admin | Updated: August 30, 2016 00:23 IST