लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नागरिकांच्या सुरक्षेसाठी २४ तास तत्पर राहणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांची स्वतःची राहण्याची व्यवस्था मात्र गंभीर संकटात सापडली आहे. जिल्ह्यातील पोलिस वसाहतींची अवस्था इतकी बिकट झाली आहे की, अनेक घरांची छतं गळक्या अवस्थेत आहेत, भिंती धोकादायक बनल्या असून स्वच्छतेचा अभाव आहे. विशेषतः पावसाळ्यात घरांत पाणी शिरत असल्याने कुटुंबीयांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य धोक्यात आले आहे.
या समस्या लक्षात घेता, नव्या सदनिका बांधणीचे काम सुरू असून त्याद्वारे लवकरच या दयनीय परिस्थितीवर तोडगा काढण्यात येईल. मात्र ४०० कुटुंबांना वसाहतीतील धोकादायक घर सोडून भाड्याच्या घरात राहावे लागत आहे. त्यामुळे अनेकांना आर्थिकदृष्ट्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी झटणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या राहण्याच्या सोयींमध्ये अनेक समस्या उभ्या आहेत. जिल्हा मुख्यालयात तीन पोलिस वसाहती असून, त्यापैकी दोन चाळी १२२ घरांसह धोकादायक अवस्थेत असल्यामुळे पाडण्यात आल्या आहेत. उर्वरित तिसऱ्या चाळीत ४२ घरे आहेत, पण त्यांचीही स्थिती समाधानकारक नाही. या घरांमध्ये गळकी छते, पडक्या भिंती, फुटलेली शौचालये आणि पाइपलाइन, तसेच स्वच्छतेच्या समस्या विकराळ आहेत. विशेषतः पावसाळ्याच्या काळात घरांत पाणी झिरपते, ज्यामुळे पोलिस कुटुंबांना शारीरिक आणि मानसिक विकार होण्याचा धोका निर्माण होतो. अनेक पोलिसांनी गळक्या छतांवर प्लास्टिकच्या आच्छादनांची तात्पुरती उपाययोजना केली आहे, पावसाळ्यात घरांतील भिंतींवर बुरशी लागते व दम्याचे त्रास वाढतात. जिल्ह्यात सध्या १६०० पोलिस कर्मचारी असून त्यापैकी ६०० मुख्यालयात आणि उरलेले एक हजार सात तालुक्यांतील पोलिस ठाण्यांमध्ये कार्यरत आहेत. मात्र, जवळपास ४०० पोलिस कुटुंबे वसाहती सोडून भाड्याच्या घरात राहत आहेत. १२२ जुन्या घरांच्या जागी सात मजली इमारत उभारली जाईल, ज्यात १० अधिकारी आणि ११२ कर्मचाऱ्यांना राहण्याची सोय राहील. ही इमारत एका वर्षात पूर्ण होण्याची शक्यता आहे.
वसाहती परिसरात सोयी-सुविधांचा अभावस्वच्छतेची समस्यादेखील गंभीर असून वसाहती परिसरात झुडपे वाढले असून पावसाने साचलेल्या पाणी-सांडपाण्यामुळे डासांचा प्रचंड उपद्रव आहे, ज्यामुळे डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांचा धोका वाढतो. सांडपाण्याचा निचरा न झाल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून त्यामुळे रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आहे. काही पोलिस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांनी रात्री उंदरांपासून देखील त्रास घेतला आहे.
"भंडारा वगळता तुमसर व साकोली येथे देखील पोलिस निवास प्रकल्पाचे काम सुरू आहे. लवकरच त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध होणार आहे."- जितेंद्र बोरकर, प्रभारी होम डीवायएसपी