जवाहरनगर : पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या अशोकनगर येथील एका युवकाने गावातील महिलांचे अश्लील व्हिडिओ क्लिप काढल्याच्या प्रकरणाचा तपास 'एलसीबी'कडे सोपविण्यात आला आहे.याबाबत तक्राार करूनही पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्याने गावातील महिलांनी पत्रकार परिषद घेऊन रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. पोलिस विभागाने याची गंभीर दखल घेत हे प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेकडे (एलसीबी) सुपूर्द केले आहे.शनिवारी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक धुसर यांनी गावातील महिलांचे बयान नोंदविले. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाला आता गती मिळण्याची शक्यता आहे. अशोकनगर (फुलमोगरा) येथील या युवकाला गावातीलच एका दाम्पत्याचे छायाचित्र काढताना ५ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीच्या सुमारास पकडण्यात आले. त्यावेळी त्याने महिलांचे नग्न छायाचित्र तसेच व्हिडिओ चित्रीकरण केल्याची कबुली दिली. त्याच्याजवळ दोन मोबाईल आढळून आले. परंतु, पोलिसांनी कोणतीही कारवाई न करता सोडून दिले. अखेरीस गावातील महिलांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क केल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला. परंतु, तो पुन्हा सुटून आल्याने आता गावकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. (वार्ताहर)
‘त्या’ चित्रीकरणाचा तपास 'एलसीबी'कडे
By admin | Updated: February 16, 2015 00:37 IST