स्वच्छतामित्र वक्तृत्व स्पर्धा : विद्या झोडे, रुपाली दिघोरे ठरल्या विजेत्याभंडारा : ना गाडी, ना बंगला पाहिजे तर सासरच्या घरी फक्त एक शौचालय पाहिजे, आप मेरा एक बार कहना मान लिजीए, घर मे एक बार संडास बनवा लिजिए, अशा एक नव्हे तर अनेक एकापेक्षा एक सरस काव्यपंक्तीने स्वच्छतामित्र वक्तृत्व करंडक स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विचार मांडल्याने स्वच्छ भारत मिशन या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेण्यात आलेली स्पर्धा अधिकच प्रभावी ठरली. कनिष्ठ व वरिष्ठ गटातील स्पर्धकांनी एवढ्यावरच आपले विचार मर्यादित ठेवले नाही तर निर्मलग्रामच्या सरपंचाची गावाप्रती भूमिका, मानवी आरोग्याला शुद्ध व स्वच्छ पाण्याची गरज, आपले पाणी आपली योजना, हागणदारीमुक्त गावांसाठी तरुण युवकांचा सहभाग, स्वच्छतेचे विचार घराघरात पोहचविण्यासाठी तरुणाईचा जोश, स्वच्छतेतून समृद्धीकडे गावांना नेण्यासाठी लोकसहभागीय भूमिका यासह विविध विषयावर आपले विचार स्पर्धेतून मांडून गावांना स्वच्छ व समृद्ध बनविण्यासाठी सकारात्मक संदेश दिला.जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन जि.प. भंडारा व पंचायत समिती लाखांदूर यांचे वतीने १७ आॅक्टोबर २०१५ ला लाखांदूर येथे शिक्षण विभागाच्या सभागृहात कनिष्ठ व वरिष्ठ गटासाठी स्वच्छता मित्र वर्क्तृत्व करंडक स्पर्धा पार पडली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांचे प्रतिमेला माल्यार्पणाने स्पर्धेचे उद्घाटन पार पडले. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांचे मार्गदर्शनात उपमुख्यकार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) धांडे, गट विकास अधिकारी झिंगरे यांचे नेतृत्वात पार पडलेल्या स्पर्धेला यावेळी सेवानिवृत्त प्राचार्य भेंडारकर, सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी एस.झेड. राऊत, सेवानिवृत्त प्राचार्य बी.एस. मेश्राम, विस्तार अधिकारी मेंढे, जिल्हा कक्षाचे माहिती शिक्षण संवाद सल्लागार राजेश्वर येरणे, वित्त नि संपादणूक सल्लागार बबन येरणे, गट समन्वयक त्रिरत्ना उके, समूह समन्वयक जगदीश तऱ्हेकार, चेतन मेश्राम आदी मान्यवरांची उपस्थिती होती.यावेळी मार्गदर्शन करताना सेवानिवृत्त प्राचार्य भेंडारकर म्हणाले, ग्रामीण भागात शुद्ध व स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आ वासून उभा ठाकतो आहे. मानवी आरोग्याला चांगले ठेवायचे असेल तर शुद्ध पाणी गावागावात मिळणे आवश्यक आहे. शरीराला आजार जडल्यास ज्या प्रमाणे औषधोपचाराची गरज असते, त्याच प्रमाणे शुद्ध व स्वच्छ पाण्याची गरज आहे. याकरिता विद्यार्थी युवकांनी पाणी व स्वच्छतेबाबतचे आपले विचार गावागावात पोहचविले तर सकारात्मक विचारांचा फायदा नागरिकांकरिता करून घेता येईल असे सांगितले. एकापेक्षा एक सरस विचार स्पर्धेतून मांडण्यात आल्याने स्पर्धेत पाणी व स्वच्छतेची वातावरण निर्मिती झाली होती. कनिष्ठ व वरिष्ठ गटातील विद्यार्थ्यांनी पाणी व स्वच्छतेबाबत एकापेक्षा एक सरस मांडलेल्या विचारांचे मूल्यांकन केल्यानंतर परीक्षकांनी स्पर्धेचा निकाल घोषित केला. त्यात कनिष्ठ गटात रुपाली दिघोरे ही प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली तर द्वितीय सनम लोणारे, तृतीय प्रतीक्षा बोरकर ठरली. वरिष्ठ गटातून विद्या झोडे ही प्रथम ठरली तर द्वितीय नेहा तिघरे व तृतीय क्रमांकाचा मानकरी मंगेश राऊत हा ठरला. यातील दोन्ही गटातील प्रथम व द्वितीय क्रमांकाचे विजेते जिल्हास्तरीय स्पर्धेकरिता पात्र ठरले. स्पर्धेचे संचालन जगदीश तऱ्हेकार यांनी तर आभार त्रिरत्ना उके यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)
सासरच्या घरी शौचालय पाहिजे
By admin | Updated: October 22, 2015 00:36 IST