आमगाव येथील शेतकरी रमेश बोंद्रे यांनी आपल्या शेतामध्ये अडीच एकरात उन्हाळी मुंग पिकाची लागवड केली. पीक जोमाने आले असताना त्या पिकांवर रोगांने आक्रमण केले. आपोआप पाने पिवळी पडू लागल्याने त्या पिकांवर कोणत्या प्रकारची औषधे फवारावी हे त्यांना माहीत नसल्याने त्यांनी कृषी कार्यालय भंडारा येथे संपर्क केला. मात्र कृषी विभागाकडून त्यांना कोणत्याच प्रकारचे मार्गदर्शन करण्यात आले नाही. फक्त तुमच्या क्षेत्रातील कृषी सहायक तुम्हाला मार्गदर्शन करणार असे सांगण्यात आले. यामुळे ते खाली हाताने परत आले. या शेतकऱ्यांना पीक वाचविण्यासाठी औषध उपचाराबाबत ज्ञान असल्याने ते कशा प्रकारे फवारावे हे माहीत नसल्याने यांनी आपल्या पिकांवर कोणत्याच प्रकारची फवारणी केली नाही. त्यामुळे आलेले पीक पूर्णपणे नष्ट झाले. शासन मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक उपाययोजना अमलात आणण्याची भाषा करीत असताना सुद्धा त्या योजना प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचे दिसून येते. परिसरामध्ये अनेक शेकऱ्यांची उपजीविका शेतीवर असून शेतामध्ये अनेक प्रकारची पिके घेतली जातात. मात्र याबाबत योग्य प्रकारचे ज्ञान नसल्याने पाहिजे त्या प्रमाणात शेतकऱ्यांना उत्पादन घेता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती दुरुस्त होत नाही. यावर्षी परिसरामध्ये अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी धान पिकाची लागवड केली. मात्र त्या पिकावर रोगांचे आक्रमण केले असून या पिकांवर कोणत्या प्रकारची औषधी फवारावी याचे ज्ञान शेतकऱ्यांना नसतानाही कृषी केंद्र चालक जी औषधे देईल या पिकांवर फवारणी शेतकरी करीत आहेत. यामध्ये औषधीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन उपलब्ध होत नसल्याने त्याची फसवणूक होत आहे. त्यामुळे कृषी विभागाने गावागावात जनजागृती करून याबाबत शेतकऱ्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनाचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:32 IST