लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : १ एप्रिलपासून विजेचे बिल प्रति युनिट ६० पैशांनी महागले असताना शासनाने कडक उन्हात राबणाऱ्या रोहयो मजुरांच्या मजुरीत दिवसाला केवळ १५ रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे रोहयो मजुरांत नाराजीचा सूर असून ही मजुरांची थट्टाच असल्याची भावना व्यक्त होत आहेत. या वाढत्या महागाईच्या दिवसात आम्ही खर्च कसा भागवायचा, असा प्रश्न आता विचारला जात आहे.
एकीकडे खासदार व आमदारांचे वेतन, तसेच शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन भरमसाठ वाढले असताना रोहयो मजुरांच्या मजुरीत तुटपुंजी वाढ करण्यात आली आहे. शासन कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात भरीव वाढ करीत असताना मजुरांना महागाईची झळ बसत नाही का, असा प्रश्नही या निमित्ताने विचारला जात आहे.
एप्रिलपासून मिळणार वाढीव मजुरीमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यातील मजुरांच्या रोजंदारीत फक्त १५ रुपयांची वाढ जाहीर करण्यात आली आहे. यानुसार १ एप्रिलपासून प्रतिदिन ३१२ रुपये मजुरी लागू झाली आहे.
ही कामे केली जातात मग्रारोहयोतूनशासन ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीसाठी दरवर्षी रोहयो कामे मजुरांना उपलब्ध करतो. विविध योजनांतर्गत सिंचन विहिरी, वृक्षारोपण, शेततळे, घरकुल, गोशाळा, बकरी शेड यासारखी कामे रोजगार हमी योजनेतून केली जातात. पाच एकरापेक्षा कमी जमीनधारक लाभार्थी आणि जॉबकार्डधारक मजुरांना या योजनेंतर्गत रोजगाराचा लाभ मिळतो.
३१२ मजुरी यंदा एप्रिलपासून करण्यात आली आहे.गटविकास अधिकाऱ्यांना मजुरीबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. एप्रिल महिन्यापासून नवीन दरानुसार मस्टर भरले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
"महागाईच्या तुलनेत शासनाने रोहयो मजुरीत केलेली वाढ अल्प आहे. निदान प्रतिदिन ५०० रुपये मजुरी देण्याची आवश्यकता आहे."- शंकर खराबे, रोहयो मजूर.