कुऱ्हाडीने केले वार : सिंडिकेट कॅम्प येथील घटना, मुलाला अटकतुमसर : घरगुती वादातून रागाच्या भरात मुलाने सावत्र आईवर कुऱ्हाडीने सपासप वार केले. यात आईचा घटनास्थळीच मृत्यू झाला. फूलन गुलाब पुष्पतोडे (४०) रा. सिंडीकेट कॅम्प, डोंगरी बु. असे मृत महिलेचे नाव आहे. अंगावर शहारे आणणारी ही घटना तालुक्यातील डोंगरी बु. येथे सिंडीकेट कॅम्प परिसरात शुक्रवारी रात्री ११.१५ वाजताच्या सुमारास घडली.मुलाचे नाव दुष्यंत गुलाब पुष्पतोडे (२६) रा. सिंडीकेट कॅम्प आहे. शुक्रवारी रात्री फूलन पुष्पतोडे व सावत्र मुलगा दुष्यंत पुष्पतोडे यांच्यात घरगुती कारणावरून वाद झाला. वाद विकोपाला गेल्यावर दुष्यंतने सावत्र आई फुलन हीच्या डोक्यावर व मानेवर कुऱ्हाडीने सपासप वार केले. फुलनबाई रक्ताच्या थारोळ्यात खाली पडली. घटनास्थळीच सावत्र आई फूलनचा मृत्यू झाला.एका महिन्यापूर्वी वडील गुलाब यांचा मृत्यू झाला होता. दोघांचीही घरे बाजूला आहेत. दुष्यंत याला गोबरवाही पोलिसांनी अटक केली. आरोपीविरूद्ध भादंवि ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास गोबरवाहीचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज वाढीवे करीत आहेत. गाव पातळीवर तंटामुक्त समिती अस्तित्वात आहेत. घरगुती वाद सोडविण्याची जबाबदारी या समितीची आहे. समित्या कार्यप्रवण असणे गरजेचे आहे. येथे तंटामुक्ती समितीच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. समितीपुढे प्रकरणे समोर आल्यावर निर्णय दिला जातो. कधी-कधी वेळेवर निर्णय होत नाही. (तालुका प्रतिनिधी)
मुलाने केली सावत्र आईची हत्या
By admin | Updated: May 1, 2016 00:16 IST