नागपूर : भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीसाठी जानेवारी महिना घातकच ठरत असल्याचे चित्र आहे. २७ जानेवारी २०२४ला या फॅक्टरीत भीषण स्फोट झाला होता. त्यात एका कामगाराचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या वर्षपूर्तीला तीन दिवस बाकी असतानाच शुक्रवारी ‘एलटीपी सेक्शन’मध्ये झालेल्या भीषण स्फोटामुळे येथील कामगारांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. ‘सीएफईईएस’ (सेंटर फॉर फायर, एक्स्प्लोसिव्ह अँड एन्व्हायर्नमेंट सेफ्टी) निर्देशित केलेल्या सुरक्षा उपायांचे पालन गंभीरतेने झाले का यादृष्टीने उच्चस्तरीय चौकशी होणार आहे.
२७ जानेवारी रोजी सकाळच्या शिफ्टमध्ये एचईएक्स विभागात स्फोट झाल्याने अविनाश मेश्राम या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला होता. संबंधित इमारतीचे छत पूर्णपणे उडाले होते. बारूद कोट तयार करताना हा स्फोट झाला होता व त्यावेळी मृतक एकटेच असल्याने मोठी जीवितहानी झाली नव्हती. ऑर्डनन्स फॅक्टरी प्रशासनाने अपर महाप्रबंधकांच्या नेतृत्वात तीनसदस्यीय समिती गठीत केली होती व या स्फोटाचा सखोल तपास केला होता. भविष्यात अशा घटना होऊ नयेत, यासाठी अहवाल मागविण्यात आला होता. मात्र, या चौकशीनंतरदेखील ३६३ दिवसांनीच झालेल्या स्फोटामुळे ऑर्डनन्स फॅक्टरीत स्फोटके हाताळताना आवश्यक असणाऱ्या सुरक्षा उपायांचे गंभीरतेने पालन होत नाही का, हा मुद्दा ऐरणीवर आला आहे.‘सीएफईईएस’च्या नियमावलींचे पालन अनिवार्यमागील दोन वर्षांत नागपुरात सोलर एक्स्पोसिव्ह तसेच चामुंडी एक्स्प्लोसिव्ह्समध्ये मोठे स्फोट झाले व त्यात दीड डझनांहून अधिक कामगारांचा मृत्यू झाला. या दोन्ही खासगी कंपन्या असल्याने त्यांच्या सुरक्षा उपायांची तपासणी करण्याची जबाबदारी ‘पेसो’ (पेट्रोलियम अँड एक्स्प्लोसिव्ह्ज सेफ्टी ऑर्गनायझेशन) यांची होती. मात्र, ऑर्डनन्स फॅक्टरीज या थेट संरक्षण मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली येत असल्याने त्यांना ‘सीएफईईएस’ने जारी केलेल्या सुरक्षा उपाययोजनांचे पालन करावे लागते. ‘सीएफईईएस’ हे ‘डीआरडीओ’चे युनिट आहे. मात्र, भंडारा येथे या सुरक्षा उपाययोजनांचे योग्यपणे पालन करण्यात कुठेतरी त्रुटी राहिली व त्यातच हा जीवघेणा स्फोट झाला.मानवी चूक की उपाययोजनांतील त्रुटी?वर्षभरात या ऑर्डनन्स फॅक्टरीतील हा दुसरा मोठा स्फोट असल्याने संरक्षण मंत्रालयाने या स्फोटाची गंभीर दखल घेतली असून तातडीने चौकशी समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. एक्स्पोसिव्ह फॅक्टरीत मानवी चुकांमुळे किंवा सुरक्षा उपाययोजनांत लहानशी त्रुटी राहिल्याने भीषण स्फोट होऊ शकतो. भंडारा ऑर्डनन्समध्ये झालेल्या स्फोटाचे नेमके कारण शोधण्याचे मोठे आव्हान आता तेथील प्रशासनासमोर आहे. या चौकशी समितीत उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा समावेश असेल.ऑर्डनन्स फॅक्टरीजसाठी नियमावलीतील प्रमुख मुद्दे- ‘सीएफईईएस’च्या मार्गदर्शक तत्त्वांचे तंतोतंत पालन अनिवार्य- धोकादायक ऑपरेशन्समध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना ‘पर्सनल प्रोटक्टिव्ह इक्विपमेंट’ देणे आवश्यक.- सुरक्षेच्या दृष्टीने कर्मचाऱ्यांचे नियमित प्रशिक्षण गरजेचे- प्रशासनाकडून फॅक्टरीतील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षा योजनेला सर्वोच्च प्राधान्य अपेक्षित- ‘सीएफईईएस’च्या सुरक्षा उपाययोजनांच्या अंमलबजावणीची नियमित तपासणी२०१६-२०१८च्या पुलगाव स्फोटांची जखम झाली ताजी३१ मे २०१६ मध्ये पुलगाव ऑर्डनन्स फॅक्टरीत मोठा स्फोट झाला होता व त्यात १९ जणांना जीव गमवावा लागला होता. तर २० नोव्हेंबर २०१८ रोजी झालेल्या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता व १९ जण गंभीर जखमी झाले होते. स्फोटकांना वाहनांमधून खाली उतरविताना तो स्फोट झाला होता.