कोविड पाॅझिटिव्ह पेशंट हा १२ ते १४ दिवस सामान्य निरोगी व्यक्तीस संसर्ग पसरवू शकतो. मला काही लक्षणे नाहीत, मी आता बरा आहे, मला काहीच त्रास नाही, मी नाॅर्मल आहे, अशी कारणे सांगत ही व्यक्ती पाच ते सात दिवसातच घराच्या बाहेर पडून सुपर स्प्रेडरची भूमिका निभावत आहेत. सरकारला दोष देत बसण्यापेक्षा आपण प्रशासनाला काय मदत करू शकतो, हा विचार आता प्रत्येकानेच करणे आवश्यक झाले आहे. सरकार, प्रशासन त्यांच्या पातळीवर पूर्ण ताकदीने काम करीत आहे. आपण सुजाण नागरिक म्हणून प्रशासनाच्या पूर्णपणे पाठीशी उभे राहिले पाहिजे. होम क्वारंटाईन पेशंटने १४ दिवस घरातच आयसोलेशनमध्ये राहून प्रशासनाला मदत केली पाहिजे. कोरोना संसर्गाचा वाढता प्रसार थांबविला पाहीजे. सुपर स्प्रेडर स्वतःच्या परिवारासाठीही घातक ठरत आहेत, तितकेच ते समाजासाठीही. मात्र अनेकांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. होम क्वारंटाईन कोविड पाॅझिटिव्ह असलेल्या प्रत्येकांनी आपली सामाजिक जबाबदारी म्हणून व प्रशासनाला आपली मदत म्हणून खारीचा वाटा उचलून सुपर स्प्रेडर बनत बाहेर फिरणे टाळावे व आपला होम क्वारंटाईन पिरिएड घरात राहून पूर्ण करावा, असे आवाहन केले जात आहे. जनतेने विनाकारण बाहेर फिरणे टाळणे, मास्कचा वापर करीत काळजी घ्यावी, असे आवाहन मोहाडी तालुका पत्रकार संघ, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते यांनी एका निवेदनाद्वारे केले आहे.
होम क्वारंटाईन रुग्णाने बाहेर फिरणे धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:35 IST