तुमसर पालिकेचे दुर्लक्ष : कोऱ्या कागदावरच होतो लाखो रूपयांचा गैरव्यवहारतुमसर : नगर पालिकेच्या मालकी हक्काची व मुख्य बाजारपेठेतील जागा व्यापारीवर्ग एकमेकांना परस्पर विकून लाखो रूपयांचा अपहार करण्याचा प्रकार तुमसरात जोमात सुरू आहे. याकडे मुख्याधिकारी व नगराध्यक्षांचे दुर्लक्ष झाले आहे.तुमसर शहराच्या मध्यभागी तुमसरची बाजारपेठ पालिकेच्या हक्काच्या मालकीच्या जागेवर आहे. साधारणत: ८० टक्के जागा पालिकेच्या मालकीची असून त्या जागेवर दुकानाचे गाळे तयार करून सदर जागा पालिकेने दुकानधारकांना लिजवर दिले आहे. ही जागा पालिकेची असल्यामुळे जागा खरेदी-विक्रीचा प्रश्नच उद्भवत नाही. मात्र एखाद्याचा व्यवसाय चालत नसेल किंवा आणखी जास्त पैसा मिळवायचे असल्यास त्या जागेची तो व्यापारी परस्पर विक्री करून त्याठिकाणी व्यापार करण्याची परवानगी देऊन लक्षावधी रूपये व्यापारी आपल्या घशात टाकत आहे. यातून पालिकेला काही मिळत नाही. तरीदेखील अशा प्रकाराकडे पालिका प्रशासनाला काहीच माहिती नाही. पालिकेच्या सामोरील व मालकीच्या जागेवरवर लाईन क्रमांक १ येथील दुकान गाळ्यातील दुकान क्रमांक २० हे दुकान वंदना नंदलाल लालवानी यांना पालिकेने दुकानगाळे व जागा लिजवर दिलेली आहे. त्या ठिकाणी कापड दुकान आहे. मात्र त्या दुकानदाराने शक्कल लढवून त्या दुकानाची दोन दुकानात विभागणी केली आणि एका भागात आपली दुकान थाटून दुसरे दुकान ईश्वर चौधरी नामक व्यापाऱ्याला ४० लाख रूपयात परस्पर विकून एका कोऱ्या कागदावर खरेदी केली. एवढा मोठा व्यवहार होऊनही पालिका प्रशासनाला हे कळले कसे नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तुमसर शहराला स्वच्छ व सुंदर बनविण्याकरिता विकासाची कामे होत असताना पालिकेने स्वत:च्या मालमत्तेचे जतन करणेही गरजेचे आहे. शहरात व्यापाऱ्यांच्या या प्रकारामुळे मालमत्तेची हानी होत आहे. तरुण नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे व मुख्याधिकारी चंद्रशेखर गुल्हाने यांनी पालिकेच्या मालमत्तेची जतन करावे, अशी सुज्ञ नागरिकांची मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)
पालिकेच्या जागेची व्यापाऱ्याकडून परस्पर विक्री
By admin | Updated: September 30, 2015 00:48 IST