भंडारा : जिल्ह्यात नगर परिषद निवडणूकीची आचार संहिता लागू असताना याच कालावधीत शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या करण्यात आल्या. या प्रक्रियेत आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप केला जात आहे. आचार संहितेचे उल्लंघन करण्यात आल्याने संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दिपक गजभिये यांनी केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांना निवेदन दिले. जिल्ह्यात आंतरजिल्हा बदलीतून ११७ शिक्षकांचे समायोजन करण्यात आले. शिक्षण विभागाने रोस्टरविनाच शिक्षकांना समायोजनाचे आदेश दिले. यात जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापतींसह जिल्हा परिषदेतील अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी देखील हात ओले केल्याचा गजभिये यांचा आरोप आहे. जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे, प्राथमिक शिक्षणाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी १२ डिसेंबरला आचार संहितेच्या काळात या बदल्या केल्या. ११७ शिक्षकांचे समायोजन करण्यासाठी शिक्षण विभागाकडून कार्यवाही करण्यात आली. मनमर्जीने शिक्षकांचे समायोजन करुन आदेश निर्गमित करण्यात आले. (नगर प्रतिनिधी) गजभिये यांनी काही शिक्षकांच्या बदल्यांसाठी सांगितले होते. मात्र नियमात बसत नसल्याने त्या करता आल्या नाही. बदल्या या नियमानुसार करण्यात आल्या. जिल्ह्यात शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. केलेला आरोप आकसापोटी आहे. राजेश डोंगरे, जि.प. उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती जि.प. भंडारा
आंतरजिल्हा बदलीप्रकरण : आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप
By admin | Updated: December 25, 2016 00:38 IST