प्रवाशी सुविधांचे आश्वासन : निवेदनात विविध मागण्यांचा समावेश सौंदड : नागपूर रेल्वे झोनचे डीआरएम यांनी निरीक्षणासाठी निवडलेल्या स्थानकांचा दौरा केला. यातच त्यांनी सौंदड रेल्वे स्थानकाला भेट दिली. त्यावेळी सौंदड रेल्वे स्थानकावर त्यांचे स्वागत करण्यात आले. निरीक्षणासाठी निवडलेल्या स्थानकांमध्ये हिरडामाली, सौंदड, अर्जुनी मोरगाव, वडसा, नागभिड व मूल रोड या रेल्वे स्थानकांचा समावेश होता. सौंदड रेल्वे स्थानकावर डीआरएम अमितकुमार अग्रवाल यांचे पुष्पगुच्छ देवून सौंदडवासीयांनी स्वागत केले. याप्रसंगी ग्रामस्थांनी त्यांनी रेल्वेस्थानकावरील अडीअडचणी सांगितल्या. तसेच समस्या सोडविण्यासाठी विविध मागण्यांचे निवेदन दिले. निवेदनानुसार प्लॅटफार्मवर संगणकीय आरक्षण दिवसभर सुरू ठेवण्यात यावे, फुटवेअर ओव्हर ब्रिज तयार करावे, मालधक्का व तिसरी रेल्वेलाईन स्थानकावर मंजूर करावी, राष्ट्रीय महामार्ग-६ वर उड्डाणपूल तयार करण्यात यावे, दरभंगा-सिकंदराबाद गाडीचा थांबा येथे मंजूर करावे, एटीएमची सोय व कॅसलेस मशिनची व्यवस्था करण्यात यावी, प्रवाशांच्या सोयीसाठी प्लॅटफार्मवर शेड व इतर साहित्यांचा पुरवठा करावा आदी मागण्यांचा समावेश आहे. निवेदन देतेवेळी अशोक लंजे, बबलू मारवाडे, सचिन लोहिया, अनिल कऱ्हाडे, संतोष अग्रवाल, गायत्री इरले, पप्पी इंगळे, सोनू मोदी, रेल्वेचे कर्मचारी, एस.एस. चंदनखेडे, नंदकुमार सिंह, रामकृष्ण कुमार, विजयानंद नंदेश्वर, उमेश मेश्राम, विवेककुमार सिंह, मिथून चोरमेले, आशिष मोदी व इतर गावकरी उपस्थित होते. सौंदड रेल्वे स्थानकावर असणाऱ्या गैरसोयींकडे आम्ही गांभीर्याने लक्ष देवून प्रवाशांना पुरेपूर सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे डीआरएम अग्रवाल यांनी यावेळी सांगितले. (वार्ताहर)
डीआरएमने केले स्थानकांचे निरीक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2016 00:51 IST