भंडारा : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असून शिक्षणाधिकाऱ्यांनी सेवाज्येष्ठांना डावलून डीएड अहर्ताधारकांना प्राधान्य दिले आहे. खाजगी अनुदान शाळामध्ये भौतिक सुविधा नसतांनाही विद्यार्थ्यांकडून जमा करण्यात आलेल्या प्रवेश शुल्क शाळा विकास निधीच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे या गंभीर प्रकाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य विजय खोब्रागडे यांनी आयोजित पत्रपरिषदेत केली.जिल्हयातील अनेक शाळांची स्थिती धोकादायक असतांना शिक्षणाधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. खाजगी अनुदानानित शाळेत भौतिक सुविधा बंधनकारक असतांनाही त्या शाळांमध्ये या सुविधा नाही. शासन निर्णयानुसार केंद्रप्रमुखांना दर आठवड्यात ६ तासाचे अध्यापन करणे आवश्यक आहे. परंतु केंद्रप्रमुखाने अद्यापपर्यंत अध्यापन केलेले नाही. शिक्षणाधिकारी प्राथमिक या जकातदार शाळेत प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी प्रति विद्यार्थी २५०० रुपये प्रवेश शुल्क विद्यार्थ्यांकडून जमा केला परंतु ही रकम शाळा विकास निधीच्या खात्यात जमा केली नाही. याबाबत तक्रार केली असता २६ नोव्हेंबर रोजी १ लाख रुपये शाळा विकास निधीच्या खात्यात जमा केल्याचे स्पष्ट झाले. शिक्षणाधिकारी प्राथमिक या तुमसर येथून अपडाऊन करतात. अतिरिक्त प्रभार सांभाळत आहेत तेव्हापासून ते घरभाडे भत्ता सुध्दा घेत आहेत. ही शासनाची दिशाभुल नाही का? असा प्रश्नही उपस्थित करुन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.(जिल्हा प्रतिनिधी)
शिक्षण विभागाची गैरव्यवहाराची चौकशी करा
By admin | Updated: December 4, 2014 23:04 IST