१६ कुटुंबांना गॅस जोडणीचे वाटप : ग्रामवन समितीच्या माध्यमातून झाला कार्यक्रमलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लाखनी तालुक्यातील शिवनी (मोगरा) या गावाने केलेल्या विकासकामांची दखल केंद्र सरकारने घेतली आहे. या गावाला विविध उपक्रम राबविल्याचा पुरस्कारही मिळाला आहे. आता या गावाने धूरविरहित गाव बनण्यासाठी पुढाकार घेतला आहे. गावातील १६ कुटुंबांना नवीन गॅस जोडणीचे वितरण करण्यात आले. वनविभागाच्या वतीने ग्रामवन समितीची शिवणीमध्ये स्थापना करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष रविंद्र खोब्रागडे असून त्यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या कार्यकारिणीने यासाठी पुढाकार घेतला. गावाशेजारी असलेल्या जंगलाचे संवर्धन करण्याच्या दिशेने गाव विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार गावातील नागरिकांना स्वयंपाकासाठी लागणारे जळाऊ लाकूड यापूर्वी नागरिक जंगलातून आणत होते. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याची बाब ग्रामस्थांना पटली. ती थांबविण्यासाठी ग्रामस्थांनी ग्रामवन समितीच्या माध्यमातून वृक्षतोड थांबविण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे गावातील अनुसूचित जाती व जमातीच्या ज्या कुटुंबाकडे गॅस जोडणी नाही अशा कुटुंबांना गॅस व सिलिंडरचे वाटप करण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला.त्यानुसार गावातील ज्या कुटुंबाकडे गॅस व सिलिंडर नाही अशा कुटुंबाचे सर्व्हेक्षण करण्यात आले व त्यात गावातील १६ कुटुंब गॅस जोडणी नसल्याचे लक्षात आले. या कुटुंबियांनी ग्रामवन समितीकडे अर्ज सादर केले. त्यानुसार त्यांना गॅस जोडणीचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला ग्रामवन समितीचे अध्यक्ष रविंद्र खोब्रागडे, वनक्षेत्राधिकारी बेग, वनरक्षक मेश्राम, वनपाटील दिगांबर राऊत, वनरक्षक लांजेवार, सरपंच माया कुथे, उपसरपंच सतीश शेंडे, ग्रामपंचायत सदस्य जीवनदास नागलवाडे, भीमराव खांडेकर, रेखा लांडगे, रेखा शेंडे, सचिव जयंत गडपायले यासह ग्रामस्थ उपस्थित होते. गावातील प्रत्येक नागरिकांनी वनांचे संवर्धन करून जंगलातून कोणतीही वृक्षतोड करू नये असा ठरावच या माध्यमातून सर्वानुमते घेण्यात आला. या कुटुंबाला दिली भेटगावातील अनुसूचित जातीच्या टिकाराम खांडेकर, सुदाम खांडेकर, सुदेश खांडेकर, सुरेंद्र मेश्राम, मुकेश कांबळे, मिथून तांडेकर, मेघराज कांबळे, प्रकाश कुनभरे, कुंदा बोरकर, विलास खांडेकर, प्रमोद खांडेकर, नरेंद्र कांबळे, ब्रम्हदास गणवीर, गोपाल गणवीर यांना गॅस वितरण करण्यात आले.
धूरमुक्त गावासाठी शिवणी ग्रामस्थांचा पुढाकार
By admin | Updated: June 26, 2017 00:23 IST