मोहाडी तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन : विदर्भ राज्य आंदोलन समिती सरसावली भंडारा : एप्रिल व मे महिण्यात वादळी व अवकाळी पावसामुळे मोहाडीच्या ग्रामीण भागातील घरांचे अतोनात नुकसान झाले असून जवळपास ३०० कुटुंबे बाधित झाली आहेत. आता पावसाळा लवकरच सुरु होत आहे. आणि त्यामुळे या भागातील गरीब कुटुंबाना तातडीने शासकीय मदत पुरविली जाने अतिशय गरजेचे आहे. असे असले तरी प्रशासन संथ गतीने कार्यवाही करीत आहे. विदर्भ राज्य आंदोलन समिती भंडारा जिल्हा याबाबत न्याय मिळवून देण्यास पुढे सरसावली असून ३ जून रोजी कोअर कमिटी सदस्य माजी आमदार आनंदराव वंजारी, माजी आमदार मधुकर कुकडे आणि जिल्हाध्यक्ष अॅड. पद्माकर टेंभुर्णीकर यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांसह मोहाडीचे तहसिलदार देशमुख यांना घेराव करण्यात आला. वाऱ्याचा वेग व पर्जन्य मापनाची व्यवस्था आमच्याकडे नाही. अशी सबब सांगून प्रकरणे निकाली काढता आले नाही असे उत्तर देताच माजी आमदार आनंदराव वंजारी यांनी प्रत्यक्ष घरांचे पडझड होऊन मोठे नुकसान झाल्याचे स्पष्ट दिसत असल्याचे म्हटले. लोकांचा संसार पावसात वाहून गेल्यानंतर मदत पाठवणार आहात का? असा प्रश्न अॅड. पद्माकर टेंभुर्णीकर यांनी उपस्थित केला. प्रशासनाने कर्तव्यात दिरंगाई करु नये. अन्यथा पावसाळा सुरु झाल्यावर जन आक्रोशाचा बांध फुटेल व त्यासाठी प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा देवून बाधित कुटूंबांना आर्थिक व वस्तुरुप मदत पुरवावी, अशी मागणी केली. माजी आमदार मधुकर कुकडे म्हणाले, नुकसानीचे पंचनामे तयार केले नाही. यावरुन प्रशासन कासवगतीने चालत आहे. याकडे लक्ष वेधून पावसाळा सुरु होण्याच्या आधी लोकांना शासकीय मदत उपलब्ध करुन द्या असे सांगितले.तहसिलदार देशमुख यांनी सांगितले की, ७ व २७ एप्रिल २०१६ रोजीच्या वादळी पावसामुळे १९ घरांचे नुकसान झाले तर ४, ५, १२ मे २०१६ रोजीच्या वादळी पावसामुळे १०३ घरांचे नुकसान झाले. २०, २१ व २७ मे २०१६ रोजी झालेल्या वादळी पावसामुळे १५४ कुटूंबे बाधित झाली, असे एकुण २७६ कुटूंबे बाधित झाली. यात पोल्ट्रीफार्म मधील कोंबड्याचा सुध्दा समावेश आहे. वादळाचा ताशी वेग उपलब्ध नसल्यामुळे अतिवृष्टी झाली नसल्यामुळे सदर पंचनामे नियमाप्रमाणे निकाली काढता आले नाही. विशेष बाब अंतर्गत मंजूरीसाठी प्रकरणे जिल्हाधिकाऱ्याकडे ३० मे रोजी पाठविल्याचे सांगितले. विदर्भ राज्य आंदोलन समितीने तहसिलदारांना उपरोक्त मागणीसाठी निवेदन सादर केले. यावेळी महासचिव रमाकांत पशिने, उपाध्यक्ष वासुदेवराव नेवारे, अविनाश पनके, कोषाध्यख अर्जुन सुर्यवंशी, युवाध्यक्ष तुषार हटेवार, शहर अध्यक्ष प्रमोद मानापुरे, शहर उपाध्यक्ष केशव हुड, दामोधर क्षिरसागर, ग्रामीण अध्यक्ष प्रा. प्रेमलाल लांजेवार, देवदास गभणे, विजयकुमार दुबे, जाधवराव साठवणे, विजय पारधी, गोविंदराव चरडे व कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
आपत्तीग्रस्त कुटुंबीयांच्या मदतीसाठी पुढाकार
By admin | Updated: June 7, 2016 07:32 IST