लाेकमत न्यूज नेटवर्कदेवरी : देवरी नगरपंचायतने शहरातील मस्कऱ्या चौक ते बौद्ध विहार पर्यंत सिमेंट काँक्रेट रस्त्याचे बांधकाम करीत दोन्ही बाजूला गट्टू बसविले. मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे ट्रकचे चाक या गट्टूंमध्ये खड्डा पडून अडकले. यावरून या कामावर प्रश्न चिन्ह लागले असून या कामाची चौकशी करून कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे. देवरी नगरपंचायत झाल्यापासून शहराच्या विकासासाठी कोट्यवधी रुपये शासनाकडून प्राप्त होत आहेत. अशात शहरातील जनतेला दर्जेदार रस्ते उपलब्ध करुन देण्यासाठी आवश्यक असलेल्या ठिकाणी सिमेंट काँक्रीटचे पक्के रस्ते, नाली व गट्टू कामे केली जात आहेत. त्यानुसार प्रभाग क्रमांक-१० मध्ये राहत असलेल्या वासनीक यांच्या बाजूला लागून असलेल्या भागातील काम करण्यात आले आहे. मात्र मागील वर्षी केलेले गट्टूचे बांधकाम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे असून या रस्त्याने जात असलेल्या ट्रकचे चाक रस्त्यात खचले. या अपघातात कोणालाही दुखापत झाली नसली तरी या निकृष्ट कामाची पोल-खोल झाली आहे. कंत्राटदाराने काम सुरू करण्यापूर्वी जमीन सपाट करुन रोडरोलरने दबाई न करताच तुरळकपणे दगड टाकून रेती भरली व पाणी सुद्धा निट टाकले नव्हते. घाईगडबडीत सिमेंट काँक्रीट टाकून रस्तावर गट्टु बसविले त्यात योग्य त्या साहित्याचा वापर केला गेला नाही. परिणामी ट्रकचे अख्खे चाकच त्या रस्त्यात खचले. परिसरातील नागरिकांनी विभागीय चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच कामावर झालेला खर्च दोषी कडून वसुल करुन रस्ता पुन्हा अंदाजपत्रकानुसार बांधून द्यावा अन्यथा नगरपंचायत समोर जनआंदोलन करण्यात येईल असा ईशारा नागरिकांनी दिला आहे.
अंदाजपत्रकाला बगल देऊन निकृष्ट कामे - नगरपंचायतमधील घरकुल निधी, घन व्यवस्थापन व निविदा प्रकरण जनतेत चर्चेत असून या प्रकाराने त्यात भर पडली असून नगरपंचायतच्या बांधकाम समिती, स्वच्छता व आरोग्य समिती, पाणी पुरवठा समितीच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित होत आहे. नगरपंचायतने शहरात कोट्यवधींच्या घरात रस्ते व नालीची कामे केली असुन त्यांची सुद्धा चौकशी केल्यास त्यातील अनेक कामे अंदाजपत्रकाला बगल देऊन केलेली तसेच निकृष्ट दर्जाची आढळून येतील. कमिशनखोरीमुळे या कामांकडे दुर्लक्ष केले जात आहे.