गोसे (बुज.) : गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांना आपल्या जुन्या गावातील साहित्य नवीन गावठानात नेता यावे याकरीता गोसीखुर्द धरणाचा जलस्तर वाढविण्याचे काम मागील पाच दिवसापासून २३९.६०० मीटरवर थांबविण्यात आले होते. जलस्तर वाढविण्याचे काम कालपासून सुरू करण्यात आले आहे. आज जलस्तर २३९.६५० मीटरवर गेला आहे. भंडारा जिल्ह्यातील पाथरी व सावरगाव तातडीने रिकामे करण्याची गरज आहे. केंद्रीय जलआयोगाच्या संचालकाच्या मार्गदर्शनात एका चमूने गोसीखुर्द धरणाला भेट देऊन धरणातील जलस्तर वाढविण्याच्या कामावर समाधान व्यक्त केले. संचालकांनी धरणामध्ये ३० तारखेपर्यंत २४० मीटरपर्यंत जलस्तर वाढविण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु बुडीत क्षेत्रातील अनेक गावातील प्रकल्पग्रस्त हळुवारपणे गाव सोडत असल्यामुळे जलस्तर वाढविण्याकरिता समस्या येत आहेत. पाथरी गावातील मुख्य रस्ता धरणाच्या पाण्यात बुडण्याची शक्यता असल्यामुळे सर्व गोष्टींचा विचार करूनच धरणाचा जलस्तर वाढविला जात आहे. भंडारा जिल्ह्यातील पाथरी व सावरगावला तातडीने रिकामे करण्याची गरज आहे. पाथरी गावातील ४३८ कुटूंबे धरणातील पाण्याने बाधीत होत आहेत. त्यापैकी अनेक कुटूंबानी नवीन गावठानात स्थानांतरण केले आहे. या गावातील चारही बाजूंना धरणाचे पाणी होऊन रस्ते बुडाले आहेत. या गावात अजुनही हे कुटुंब त्यांची शेती जवळ असल्याने राहत आहेत. त्यांनाही हलविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गावातील तिन्ही रस्ते बंद झाले असून एक रस्ता खुला आहे. नवेगावमध्ये पाणी शिरले असून पुर्ण गाव रिकामे झाले आहे. सिर्सीमध्ये पाणी शिरले असून उंचावरील भागात काही कुटुंबे राहत आहेत. अनेक गावातील प्रकल्पग्रस्तांना योजनेचा लाभ मिळाला नसल्यामुळे ते गाव सोडायला तयार नाहीत. (वार्ताहर)
गोसीखुर्द धरणाचा जलस्तर वाढविणे सुरू
By admin | Updated: September 27, 2014 23:09 IST