गरिबांची आर्थिक पिळवणूक : प्रत्येक तपासणीच्या शुल्कात तफावत सिराज शेख मोहाडीसर्वसामान्यांचे रूग्णालय म्हणून शासकीय रुग्णालयाची ओळख आहे. मात्र, आरोग्य विभागाने रूग्णसेवेच्या शुल्कात दुपटीने वाढ केली आहे. याची आर्थिक झळ नागरिकांना बसत आहे. शासकीय रुग्णालयात सामान्य घरातील व गरीब घरातील गरजु व्यक्तीच उपचार घेण्यासाठी येतात. साधारणता मध्यमवर्गीय व उच्च वर्गीय घरातील व्यक्ती या शासकीय रुग्णालयाकडे फिरकुनही पाहात नाही. ते आपला उपचार खासगी रुग्णालयातच करतात. शासकीय रुग्णालयात विशेषत: पाहिजे तेवढ्या सुविधा उपलब्ध होत नाही. त्यामुळेच नेहमी शासकीय रुग्णालयांच्या तक्रारी होताना आढळून येते. तरी पैशाच्या अभावापोटी गरीब जनता या शासकीय रुग्णालयातच आपला उपचार करून घेतात. मात्र आता शासनाने त्यांच्यासाठी द्वार बंद करण्याचा प्रयत्न सुरू केलेला दिसतो. बाह्य रुग्ण विभागाची चिठ्ठी पूर्वी पाच रुपयात मिळत होती. ती आता दहा रूपये झाली आहे. एवढेच नाही तर ग्रामीण भागातील महिलांना आता दुसऱ्या बाळंतपणासाठी १५० रूपये व तिसऱ्या बाळंतपणासाठी ४०० रूपये शुल्क द्यावे लागणार आहे. पुर्वी सर्व प्रसुती या मोफत करण्यात येत होत्या. तसेच बाळाची सेवाही नि:शुल्क होती. याशिवाय रुग्णालयात उपलब्ध लघवी, शुगर, रक्तगट, टाईफाईड, मलेरिया आदी चाचण्याही दुपटीने वाढल्या आहेत. त्यामुळे सामान्य व गरीबांची मोठी आर्थिक पिळवणूक होत आहे. एवढेच नाही तर जर एखाद्याच्या हातापायाला साधारण जखम झाली तर त्यावर मलपट्टी पूर्वी मोफत करण्यात येत होती. परंतु आता त्यासाठीही पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे हे सरकार गरीबांच्या जिवाशी खेळ खेळत आहे का, हेच का अच्छे दिनचे स्वप्न दाखविण्यात आले होते का, असा प्रश्न साहजिकच जनतेला पडला आहे. शासनाने केलेल्या रुग्ण सेवा शुल्क वाढीमुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. त्यामुळे राज्य शासनाने ही सेवा शुल्क वाढ त्वरित मागे घेवून सर्वसामान्यांना दिलासा दयावा, अशी मागणी होत आहे.
शासकीय रुग्णालयाच्या सेवाशुल्कात वाढ
By admin | Updated: February 15, 2016 00:12 IST