बँकेत देवाण-घेवाण सुरू : गरज नसताना ग्राहकांना हजारोंचा भुर्दंडभंडारा : दिवाळीनिमित्त बाजारपेठेत खरेदीची गडबड सुरू असताना चिल्लर नाणी नसल्याच्या कारणावरून ग्राहकांची एकप्रकारे अडवणूक केली जात आहे. शहरासह ग्रामीण भागात पाच रुपयांची नोट चलनातून बाद झाल्याची अफवा पसरली आहे. त्यामुळे या नोटेची देवाण-घेवाण पूर्णपणे ठप्प झाली आहे. चिल्लर नाणी आणि पाच रूपयांसारख्या नोटांची वाईट अवस्था यामुळे ग्राहक आणि व्यावसायिकांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. एक-दोन रुपयांच्या कागदी नोटा यापूर्वीच बाजारात दिसेनाशा झाल्या आहेत. त्यामुळे लहान व्यापाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. बँकांनी नोटा परत घेऊन नाणे उपलब्ध करून दिल्याने काहीअंशी दिलासा मिळाला. परंतु सध्या पाच रूपयांची नोट चलनातून बाद झाल्याची अफवा सर्वांसाठी डोकेदुखी बनली आहे. व्यवहार करताना किरकोळ व्यापारी, हॉटेल, टपऱ्या, ठेले, दुकानदार, भाजी विक्रेते पाच रूपयांची नोट घेण्यासाठी सरळ नकार देत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात धावणाऱ्या एसटी गाड्यांमध्ये वाहक पाच रूपयांची सुस्थितीत असलेली नोटही स्वीकारत नसल्यामुळे प्रवासात प्रवाशांची पंचायत होत आहे. नोट देवान-घेवानीवरून वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. अशा प्रवाशांच्या तक्रारी वाढत आहे. शहरात प्रत्येक रविवारी भरणाऱ्या आठवडी बाजारातही भाजी खरेदीसाठी गेलेल्या ग्राहकांकडून पाच रूपयांच्या नोटेऐवजी विक्रेते नाण्यांची मागणी करीत आहेत. बाजारात सुटे पैशांची चणचण असल्यामुळे ग्राहक-विक्रेत्यांची चांगलीच दमछाक होत आहे. एखाद्या ग्राहकांनी १५ रुपयांची खरेदी केल्यास विक्रेते २० रूपयांची नोट घेऊन उर्वरित पैसे परत देण्याऐवजी चॉकलेट ग्राहकांच्या माथी मारत आहेत. पाच रूपयांची नोट ग्राहकांकडे नसल्यास ग्राहकाने घेतलेला माल परत मागून अवमान केला जात आहे. यामुळे भाजी खरेदीसाठी गेलेल्या गृहिणी, वृद्घांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. व्यापाऱ्यांना याविषयी विचारले तर आम्ही बँकेत जेव्हा पैसे जमा करण्यासाठी जातो, तेव्हा अधिकारी पाच रुपयांची नोट घेण्यासाठी नकार देतात. त्यामुळे आम्ही पाच रुपयांची नोट घेत नाही, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. बँकेने नोट घेण्यासाठी अडवणूक करू नये, असे व्यापाऱ्यांचेही म्हणणे आहे. चलन नाकारणे हा रिझर्व्ह बँकेचा अपमान होऊन गुन्हा दाखल होऊ शकतो. परंतु काही ठिकाणी गैरसमजातून असे प्रकार घडताना दिसून येत आहे, अशा परिस्थितीत बँकांनीही वेळोवळी जनजागृती करणे गरजेचे आहे. (शहर प्रतिनिधी)
खरेदीच्या गडबडीत चिल्लरसाठी अडवणूक
By admin | Updated: October 26, 2016 00:44 IST