भंडारा : राष्ट्रीय अविष्कार अभियानाचे स्थानिक जे.एम. पटेल महाविद्यालय, भंडारा येथे उद्घाटन करताना विज्ञान आणि गणित शिक्षक समन्वयकांचे एक दिवसीय उद्बोधन कार्यक्रम घेण्यात आला. विविध महाविद्यालयातील समन्वयक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. याप्रसंगी अभियानांतर्गत विविध कृती कार्यक्रम सुरू करण्यात आले. मानव संसाधन विकास मंत्रालयाने राष्ट्रीय अविस्कार अभियानाची सुरूवात केली आहे. ज्याचा उद्देष शाळा आधारित ज्ञानाला शाळाबाह्य जीवनाशी जोडणे आणि विविध आनंददायी आणि अर्थपूर्ण कृती कार्यक्रमाद्वारे विज्ञान आणि गणित शिकणे आहे. ६ ते १८ वयोगटातील मुलांना हेरून आणि त्यांच्या बुद्धीमत्तेचा विकास करण्यासाठी त्यांच्यात जिज्ञासू वृत्ती आणि शोध वृत्तीला प्रोत्साहन देणे यावर हे अभियान सेवा पुरवित आहे.या अभियानांतर्गत विविध कृती कार्यक्रम करण्यासाठी एक मार्गदर्शन संस्था म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर यांनी जे.एम. पटेल महाविद्यालय भंडारा यांची निवड केली आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. देवानंद शहारे यांनी भूषविले, तर डॉ. जयमुर्ती चावला आणि प्रा. एस.एस. चनखोरे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमणे यांनी तरूण वयात संशोधन नवनिर्मितीची जाणिव विकसित आणि बळकट करण्यात मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या प्रयत्नांची स्तुती केली. त्यांनी या अभियानासाठी महाविद्यालयाची मार्गदर्शक संस्था म्हणून निवड केल्याबद्दल रातुम नागपूर विद्यापीठाचे आभार व्यक्त केले.अभियानाचे समन्वयक प्रा. अनिल नवलाखे आणि सहसमन्वयक प्रा. गिरधारीलाल तिवारी यांनी पावर पार्इंट प्रस्तुतीकरणाच्या माध्यमातून राष्ट्रीय अविष्कार अभियानाचे तपशिल स्पष्ट केले. याप्रसंगी आपले मत व्यक्त करताना डॉ. जयमुर्ती चावला यांनी अशा प्रयत्नाची गरज व्यक्त केली. डॉ. देवानंद शहारे यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा प्रदान केल्या. या कार्यक्रमासाठी प्रा. यशपाल राठोड यांनी प्रयत्न केले. डॉ. पद्मावती राव यांनी संचालन केले तर डॉ. विणा महाजन यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
राष्ट्रीय अविष्कार अभियानाचे उद्घाटन
By admin | Updated: August 27, 2016 00:25 IST