लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेत महिनाभरात सहा हजार १७६ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आल्या असून, त्यापैकी ४ हजार ४५० व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली. पाॅझिटिव्हिटी रेट १२.४१ तर रिकव्हरी रेट ९५.८४ टक्के आहे. तिसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांपेक्षा बरे होण्याचे प्रमाण गत दोन आठवड्यापासून अधिक आहे.जिल्ह्यात जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोना संसर्गाची तिसरी लाट आली. सुरुवातीच्या काळात कोरोना रुग्णांची संख्या अधिक होती. मात्र दोन आठवड्यातच ही लाट ओसरल्याचे दिसत असून बरे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात तिसऱ्या लाटेत सर्वाधिक रुग्ण भंडारा तालुक्यात २२६१ आढळून आलेत. त्या खालोखाल लाखनी १०४७, तुमसर १०२०, साकोली ५९०, मोहाडी ५५६, पवनी ४३२ आणि लाखांदूरमध्ये २७० रुग्ण आढळून आले आहेत. सध्या बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे.
रुग्णालयात केवळ २२ जणांवर उपचार- कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेत रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अत्यल्प आहे. जिल्ह्यात १,६२२ ॲक्टिव्ह रुग्ण असून, त्यापैकी केवळ २२ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामध्ये आयसोलेशनमध्ये १६ आणि आयसीयूमध्ये ६ रुग्ण आहेत. एकही पाॅझिटिव्ह व्यक्ती ऑक्सिजनवर सध्या नाही.
ॲन्टिजन चाचणी करणाऱ्यांचे प्रमाण अधिक- तिसऱ्या लाटेत ४८ हजार २९० व्यक्तींनी कोरोना चाचणी केली. त्यात सर्वाधिक ३८ हजार ६९१ व्यक्तींनी ॲन्टीजन चाचणी केली. तर आरटीपीसीआर चाचणी ९५९९ व्यक्तींनी केली. ॲन्टिजन चाचणीत ४६९९ तर आरटीपीसीआर चाचणीत १४४७ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत.