भंडारा : शहरातील लाल बहादूर शास्त्री वाॅर्डात असलेल्या आनंद बौद्ध विहाराजवळच दारूची अवैध विक्री होत आहे. यामुळे परिसरातील सामाजिक सुरक्षा धोक्यात आली असून, नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत. दिवसभर येथे मद्यपींची जत्रा भरत असल्याने महिला व तरुणी आवागमन करण्यास घाबरत आहेत.
भंडारा-वरठी मार्गावरील जकातदार कन्या शाळेकडे जाणाऱ्या मार्गावरील डाव्या बाजूला असलेल्या परिसरातील लाल बहादूर शास्त्री वाॅर्डात दारू विक्रीचे लहान-मोठे अड्डे आहेत. यातच बौद्ध विहाराजवळ एका दाम्पत्याने दारू विक्रीचा गोरखधंदा सुरू केला आहे. सकाळपासूनच येथे दारू विक्री व पिण्यासाठी मद्यपींची जणू जत्राच भरत असते. यामुळे परिसरातील नागरिक चांगलेच वैतागले आहेत. याबाबत त्यांनी दारू विकणाऱ्या दाम्पत्याला समजही दिली. मात्र हा प्रकार काही बंद झाला नाही. परिणामी, याची तक्रार राज्य उत्पादन शुल्क विभागाकडेही देण्यात आली. मात्र निवेदन देऊनही त्याला केराची टोपली दाखविण्यात आली. तक्रार करूनही कारवाई झाली नसल्याने दाद कुणाला मागायची, असा प्रश्न येथील नागरिकांसमोर उपस्थित झाला आहे. उल्लेखनीय म्हणजे या सर्व बाबीची माहिती स्थानिक शहर पोलिसांनाही आहे. मात्र याकडे त्यांनी कानाडोळा केला आहे. परिसरात होणाऱ्या या अवैध दारू विक्रीमुळे महिला व तरुणी परिसरात आवागमन करण्यास घाबरत आहेत. या परिसरात शाळा, बँक तसेच लहान-मोठी व्यापारी प्रतिष्ठाने आहेत. या समस्येकडे लक्ष देण्याची गरज आहे.