तुमसर : देव्हाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी स्टेशनटोलीचे उपसरपंच ग्रामस्थांनी आरोग्य केंद्राबाहेर आमरण उपोषण बसले होते. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या १५ दिवसात चौकशीचा अहवाल देण्याचे येथे आश्वासन दिले.तुमसर रोड (देव्हाडी) येथे २४ गावच्या आरोग्याची काळजी घेणारे प्राथमिक आरोग्य केंद्र सुमारे २५ वर्षापूर्वी सुरु झाले होते. गावात स्वतंत्र इमारत आहे. स्टेशनटोलीचे उपसरपंच श्याम नागपुरे यांनी जानेवारी ते आॅक्टोबर २०१४ पर्यंतच्या लेखी स्वरुपात आर्थिक गैरव्यवहाराची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली होती. परंतु साधी चौकशी येथे करण्यात आली नाही. माहितीच्या अधिकारात माहिती सुद्धा दिली नाही. त्यामुळे पुन्हा येथे शंका उपस्थित होत आहे.दि. १६ जुलै व १ आॅगस्टला तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लेखी स्वरुपात माहिती देण्यासंदर्भात बोलाविले होते. परंतु ते स्वत: उपस्थित नव्हते तथा आपले प्रतिनिधी सुद्धा उपस्थित ठेवले नाही. यावरून येथे टाळाटाळ सुरु असल्याचा आरोप श्याम नागपुरे यांनी केला आहे.या प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर्ससह इतर कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. रात्री येथे अंधाराचे साम्राज्य राहते. अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या सदनिका नादुरुस्त आहेत. त्या आरोग्य विभागाने दुरुस्त केल्या नाहीत. गांधी वॉर्डातील आरोग्य उपकेंद्र कुलूपबंद आहे. आरोग्य केंद्राची दक्षता व नियंत्रण समिती आहे. समितीमधील अध्यक्षासह केवळ सात ते आठच सदस्यांना बैठकीला बोलाविण्यात येते .जिल्हा आरोग्य अधिकारी डोईफोडे यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून १५ दिवसात अहवाल देण्याची लेखी ग्वाही दिली. आपरण उपोषणाला उपसरपंच श्याम नागपुरे, राजेश सेलोकर, भाऊलाल बांडेबुचे, बाळा मेश्राम, पिंटू सिंग बसले होते. (तालुका प्रतिनिधी)
चौकशीसाठी आमरण उपोषण
By admin | Updated: December 18, 2014 22:48 IST