भंडारा : मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कडक उन्ह जाणवू लागले असून घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. सोमवारी कमाल तापमान ३५ डिग्री सेल्सीअसवर पोहोचले होते. शुष्क हवेमुळे तापमानात वाढ होत आहे. सर्वसाधारणपणे मार्च महिन्यापासूनच उन्हाळ्यास सुरूवात होते. शेवटच्या आठवड्यात पारा ४० डिग्रीवर पोहोचतो. मंगळवारी सकाळी कमाल तापमान ३४.५ तर सायंकाळी ३७ अंश सेल्सियस नोंदविण्यात आले. सोमवारी पारा ३५ डिग्री सेल्सिअसला पार झाला होता. मंगळवारी सकाळपासूनच उन्हाचे चटके जाणवू लागले होते. दुपारी तर घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या. मार्चच्या शेवटपर्यंत पारा एक ते दोन डिग्री आणखी वाढू शकतो, असा दावा हवामान विभागाने केला आहे. तापमानाच्या पाऱ्याने ३५ कडे वाटचाल सुरू केली आहे. सकाळी ११ नंतरच उन्हाच्या झळा लागू लागल्या आहेत. दुपारी १ नंतर बऱ्याच रस्त्यांवरील वर्दळही कमी दिसत आहे. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी शेला, टोप्या, गॉगल, दुपट्ट्यांचा वापर वाढला आहे. शिवाय उन्हापासून शरीराचे रक्षण करण्यासाठी थंडपेयांचीही विक्री वाढली आहे. आईसगोला, लिंबू सरबत, उसाच्या रसासह विविध फळांच्या विक्रीचे हातगाड्या शहरभर दिसून येत आहेत. उन्हाचे खरे रूप एप्रिलनंतर पाहायला मिळेल. (नगर प्रतिनिधी)
जाणवू लागले उन्हाचे चटके
By admin | Updated: March 25, 2015 00:42 IST