लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : तुमसर तालुक्यातील सिहोरा परिसरातून गेलेल्या वैनगंगा नदीवर धरणाचे बांधकाम करण्यात आले. धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाला पाणीपुरवठा करण्यासाठी धरणाचे बांधकाम झाले आहे. धरणातील पाण्याने सिहोरा परिसरातील शेती बुडीत गेली आहे. नदीचे काठ आणि नाल्याच्या लगत असणारी शेती बुडीत क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. प्रति हेक्टरी आर्थिक मदत शेतकऱ्यांना देण्यात आली असली, तरी पुन्हा याच शेतकऱ्यांची नावे जुलै ऑगस्ट महिन्याच्या पूरग्रस्तांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत. यामुळे वंचित पूरग्रस्त शेतकरी संतापले आहेत.
जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, असे तीनदा पुराचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतीत शिरले. या पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांनी केवायसी केल्यानंतर शासन स्तरावरून शेतकऱ्यांच्या बचत खात्यात आर्थिक मदत वळती केली जात आहे; परंतु अनेक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नावे यादीत नसल्याने संतापले आहेत.
धरणात पाणी अडविण्यात आल्यानंतर सिहोरा परिसरातील नदीचे काठ आणि बुडीत नाल्याच्या लगत असणारे शेतीचे सर्वेक्षण करण्यात आले. नाल्यापासून १०० मीटर अंतरावर शेती आणि बांधकाम प्रतिबंधित करण्यात आले आहे.
पूरग्रस्त अनुदानाचा पुन्हा लाभ कसा ?बुडीत शेतीत उत्पादन आणि पक्के बांधकाम करण्यास बंदी आहे. ही शेती उपसा सिंचन प्रकल्पासोबत करारबद्ध झाली आहे. धापेवाडा प्रकल्पाच्या बुडीत शेतीला पुन्हा शासन स्तरावरून नुकसानभरपाई देता येत नाही.
एका शेतकऱ्याचे नाव दुसऱ्याही यादीतयाशिवाय अवकाळी पावसामुळे नुकसान झाले असता, यादीत या करारबद्ध शेतीचा समावेश करता येत नाही. प्रसिद्ध करण्यात आलेल्या पूरग्रस्तांच्या यादीत भलतेच चित्र अनुभवास आले आहे. जे शेतकरी करारबद्ध नाहीत, अशा शेतकऱ्यांचे पुराच्या पाण्याने नुकसान झाले असताना, यादीत नावांचा समावेश करण्यात आला नाही, तर जे शेतकरी करारबद्ध करण्यात आले आहेत, त्यांची एक नव्हे अनेक नावे यादीत आली.
अतिवृष्टीग्रस्त अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेतगतवर्षी शेतीचे अतिवृष्टी व पूरपरिस्थीतीमुळे मोठे नुकसान झाले. नदी व नालाकाठावरील शेतीतील पीके खरडून वाहून गेली. प्रकरणी पंचनामे करण्यात आले. परंतु अद्यापही काही शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाही.
वांगी, पिंपरी चुंनी, परसवाडा, चुल्हाड, देवरी देव, सुकळी नकुल, बपेरा या गावांतील शेतीचे सर्वेक्षण करीत करारबद्ध करण्यात आली आहे. परंतु, उत्पादन दन निरंक असताना नुकसान झालेच कसे, असा सवाल आहे.
"ज्यांचे नुकसान झाले, अशा शेतकऱ्यांना आर्थिक मदतीतून वगळण्यात आले आहे. धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्प सोबत करारबद्ध असणाऱ्या शेतकऱ्यांना कुणाच्या आशीर्वादाने लॉटरी लागली आहे. यादीत मोठा घोळ करण्यात आला आहे. या याद्यांची चौकशी झाली पाहिजे."- डॉ. जितेंद्र तुरकर, तालुकाध्यक्ष, राकाँ (शरद पवार गट), तुमसर.