इंद्रपाल कटकवार लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्यातील अन्य जिल्ह्यांत डेल्टा प्लसचे रुग्ण आढळल्यानंतर जिल्ह्यातही दक्षता घेण्यात येत आहे. मात्र, नागरिक याबाबत अनभिज्ञ आहेत काय, असे त्यांच्या वागणुकीवरून दिसून येत आहे. याबाबत ‘लोकमत’ने रिॲलिटी चेक केले असता सार्वजिनक ठिकाणी नागरिक मास्क विना वावरताना दिसत आहे. येथील जिल्हा परिषद चौकात दहापैकी सहा जणांनी मास्क घातले नसल्याने डेल्टा प्लसला रोखायचे कसे, असा प्रश्न उपस्थित होतो.
मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाईही नाही कोरोनाच्या महामारीत शासनाने अनेक कडक निर्बंध लावले होते. त्यात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांनाकडून दंडही वसूल करण्यात येत होता. मात्र जिल्हा कोरोनामुक्त झाल्यानंतर नागरिकांनी मास्कविना येणे-जाणे सुरू केले आहे. तरीही प्रशासन अशांवर कारवाई करीत नाही.
पोलिसांचाही मास्क तोंडाखाली - भंडारा शहरातील जिल्हा परिषद चौकात पोलीस दादांची ड्यूटी असते. कर्मचारीही मास्क घालून कर्तव्य बजावतात. मात्र मंगळवारी सायंकाळी रियालिटी चेकप्रसंगी येथील वाहतूक शाखेचे कर्मचारी मास्क घालून होते. मात्र तो मास्क त्यांच्या हनुवटीवर होता. त्यामुळे अन्य काय बोध घेतील, असाही प्रश्न उपस्थित होतो. नियम पाळणे आवश्यक झाले आहे.
भंडारा जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. सर्वांच्या सामुहिक प्रयत्नातून आरोग्य प्रशासनाने हा दिवस खेचून आणला आहे. हमखासपणे यात नागरिकांचेही सहकार्य लाभले आहेत. मात्र आता तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी त्रिसुत्रीचे पालन करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. जेणे करून डेल्टा प्लसला जिल्ह्यात शिरकाव करणे शक्य होणार नाही.- डॉ. निखिल डोकरीमारे, आरएमओ (बाह्य विभाग), जिल्हा रुग्णालय, भंडारा.