गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह : मुख्यमंत्र्यांनी दिली केवळ ५२ घरकुलांना मंजुरीतुमसर : सिंदपुरी येथे एका वर्षापूर्वी तलावाची पाळ फुटून सुमारे २०० घरांची पडझड झाली होती. नशिब बलवत्तर म्हणून गाव वाहून जाता थोडक्यात बचावले. येथे पुनरावृत्तीची भिती व्यक्त करण्यात येत आहे. एक वर्ष लोटूनही लाभार्थ्यांची घरे तयार झाली नाही. मुख्यमंत्र्यांनी केवळ ५२ घरकुल मंजूरी देण्याचे केले. प्रत्यक्षात येथे ६७ घरे पडली होती हे विशेष.सिंदपुरी येथे पावसाळ्यात गावाबाहेरील मालगुजारी तलावाची पाळ फुटून गावात मध्यरात्री पाण्याचा लोंढा शिरला. गावात एकच हाहाकार माजला होता. यात २०० घरांची पडझड झाली होती. ६७ घरे जमिनदोस्त झाली होती. त्यापैकी ५२ घरकुल मुख्यमंत्री मदत निधीतून मंजूर करण्यात आले. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून तलावांची पाळ उन्हाळ्यात तयार करण्यात आली. या पाळीच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.५२ हेक्टरमध्ये हा तलाव आहे. तलावाच्या मालकी हक्कावरून दोन शासकीय विभागात एक वाक्यता दिसली नाही. निधीची कमतरतेचे तुणतुणे येथे वाजविण्यात आले. पूर्णत: जमीनदोस्त झालेल्या घरमालकांना तात्पुरते टीन व बांबूचे शेड तयार करून देण्यात आले. स्थानिक लोकप्रतिनिधी तथा भाजप नेत्यांनी १५० घरकुल राज्य शासनाने बांधून द्यावे अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नुकतेच तुमसरात केले होते. ना. फडणवीस यांनी नियमानुसार ५२ घरकुल इंदिरा आवास योजनेअंतर्गत मिळतील अन्य घरकुलाबाबत त्यांनी चौकशी करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.सिंदपुरी प्रकरणात स्थानिक लोकप्रतिनिधी व भाजप नेत्यांनी आंदोलन केले होते. या प्रकरणात तहसीलदार सचिन यादव यांचे स्थानांतरण झाले. येथे पं.स. सभापती व तहसीलदार यांच्यात वाद रंगला होता. सिंदपुरी गावाला आमदार, खासदार, जिल्हाधिकारी तथा इतर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या होत्या.या तलावाची पाळ तयार करून अतिरिक्त पाणी जाण्याकरिता सोय करण्यात आली अशी माहिती आहे. पावसाळ्यात संपूर्ण तलाव भरल्यावर ही पाळ किती तग धरेल याबाबत शंकाच आहे. शासन व प्रशासन येथे गंभीर दिसत नाही. (तालुका प्रतिनिधी)
सिंदपुरीतील घरकूल कागदावर
By admin | Updated: July 16, 2015 00:50 IST