विद्यार्थी वंचित : रिपब्लिकन सेनेचे पालकमंत्र्यांना निवेदनभंडारा : समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहांची निर्मिती केली आहे. मात्र भंडारा येथील वसतीगृहातील विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रिया रखडल्याने अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष अचल मेश्राम यांनी नुकतीच पालकमंत्री राजेंद्र मुळक यांची शिष्टमंडळासह भेट घेवून त्यांना निवेदन दिले. या निवेदनात, समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतीगृहात दोन महिन्याचा कालावधी लोटूनही वसतीगृह प्रवेश प्रक्रिया पुर्ण झाली नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांना वसतीगृहाची व्यवस्था न झाल्याने शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे समाज कल्याण विभागाने वसतीगृहातील रखडलेली प्रवेश प्रक्रिया त्वरीत पूर्ण करावी व वसतीगृह, आश्रमशाळा, निवासी शाळा आदी ठिकाणी असलेली रिक्त पदे त्वरीत भरावी, अशी मागणी केली आहे. यावेळी शिष्टमंडळात तुळशीराम गेडाम, संजीव भांबोरे, मुलचंद मेश्राम, भिमशंकर गजभिये, खेमराज नंदेश्वर, छोटू गेडाम, भजनदास मेश्राम, प्रमोद वालदे आदींचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)
वसतीगृह प्रवेश प्रक्रिया रखडली
By admin | Updated: August 12, 2014 23:37 IST