लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दहा दिवसांपूर्वी नवेगाव येथील उसाच्या वाडीत एका मादी बिबट्याने दोन पिलांना जन्म दिला होता. ऊस कापणीला आल्याने शेतकऱ्यांनी उसाची कापणी सुरू केली असता त्यांना शेतात ही पिल्ले आढळून आली. ही माहिती भंडारा वन विभागाला दिली. तेव्हापासून या पिल्लांच्या संरक्षणासाठी वनमजूर व कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले होते. परंतु, शेतात वन्यजीव असतानासुद्धा उर्वरित शेतात उसाची कापणी सुरूच होती. त्यामुळे मानवी हस्तक्षेप निर्माण झाल्याने त्या बिबट्याने आपल्या पिल्लांची जागा दोन-तिनदा बदलली होती. वन विभागाने ती जागा शोधली व त्याठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावले होते.बुधवारी दुपारी, भंडाराचे मानद वन्यजीव रक्षक राजकमल जोब यांनी शेताला भेट दिली असता उसाच्या चार-पाच दांड्यांच्या मंडपात ती पिल्ले होती. उसाचे पीक कापले होते. सर्वत्र वाळलेला कचरा पडून होता. ज्याठिकाणी ही पिल्ले होती त्याच्या दोन शेत आड उसाची कापणी सुरू होती. तेवढ्यात त्यातील एका शेतकºयाने आपल्या शेतातील कचºयाला आग लावली. प्रखर उन आणि वारा यामुळे ही आग हळहळू वाढू लागली. आग अधिक वाढू नये म्हणून वनमजूर काळजी घेत होते. परंतु, कुठुनतरी एक ठिणगी उडाल्याने दुसरीकडचे शेत जळू लागले. क्षणात ही आग वणव्यात रुपांतरीत झाली. आता मात्र ही आग आटोक्यात आणणे शक्य नव्हते. क्षणात ही आग पिल्लांपर्यंत पोहचेल आणि त्यांचा कोळसा होईल, तोच राजकमल जोब, वनक्षेत्रपाल वसीम खान, वनरक्षक डोंगरे व वनमजुरांनी त्या पिल्लांना उचलून सुरक्षित स्थळी हलविले. पाहता पाहता ज्याठिकाणी ही पिले आधी होती तो परिसर पूर्णत: जळून खाक झाला होता. त्यानंतर सदर पिल्लांना मादी बिबट सहज शोधू शकेल अशा परिसरात सुरक्षित ठेवण्यात आले. त्यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी काही वनमजुर लावण्यात आले तसेच बिबट्याच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरा ट्रॅपही लावण्यात आले. असे असताना वन विभाग व गावकरी यांनी सामंजस्य भूमिका घेणे आवश्यक होते. मात्र तसे झाले नाही. वनाधिकाºयांच्या गलथान कारभारामुळे हा प्रकार घडला असून यापुढे वन विभागाने उपाययोजना करण्याची गरज आहे.
आगीतून बचावली बिबट्याची पिले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 00:49 IST
दहा दिवसांपूर्वी नवेगाव येथील उसाच्या वाडीत एका मादी बिबट्याने दोन पिलांना जन्म दिला होता. ऊस कापणीला आल्याने शेतकऱ्यांनी उसाची कापणी सुरू केली असता त्यांना शेतात ही पिल्ले आढळून आली.
आगीतून बचावली बिबट्याची पिले
ठळक मुद्देनवेगाव येथील घटना : वनविभागाचा गलथानपणा ठरला कारणीभूत