तुमसर : तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीला जिल्हा उपनिबंधकांनी कारणे दाखवा नोटीस बजावली असून, त्याअनुषंगाने ७ मे रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे. बाजार समिती प्रशासनास स्वतः तथा प्रतिनिधीमार्फत आवश्यक कागदपत्रांसह लेखी तथा तोंडी म्हणणे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. सदर सुनावणीत उपस्थित न राहिल्यास एकतर्फी निर्णय देण्यात येईल, असे निर्देश दिले आहेत. यावरून येथे प्रशासक नियुक्तीच्या दिशेने हालचालींना वेग आल्याची चर्चा सुरू आहे.
बाजार समितीने केलेल्या विविध विकासकामांत व घेतलेल्या निर्णयात संचालक मंडळाकडून महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री अधिनियम १९६३ व त्याअंतर्गतचे नियम १९६७ मधील तरतुदी तसेच शासनाचे व पणन संचालनालयाचे परिपत्रके निर्देश तथा सूचना तसेच बाजार समितीच्या पोटनियमांचे पालन केले नसल्याचे व समितीचे संचालकांना सोपविलेली जबाबदारी व कर्तव्य पार पाडण्यात कसूर केल्याचे ठपका ठेवण्यात आला आहे.
१ ते १५ मुद्द्यांवर बाजार समिती प्रशासनाला कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे.
यापूर्वी ४ जानेवारी २०२१, २९ जानेवारी २०२१, १२ फेब्रु. २०२१, २६ फेब्रु. २०२१, रोजी सुनावणी ठेवण्यात आली होती. त्यावेळी संचालक मंडळाच्या वतीने वकील हजर झाले होते. या सुनावणीस लेखी व तोंडी म्हणणे मांडण्याकरता पुढील तारीख मिळण्याबाबत विनंती अर्ज दिला होता. उपनिबंधकांनी सदर विनंती अर्ज मान्य केला. पुढील सुनावणी १९ मार्च रोजी निश्चित करण्यात आली; परंतु त्या दिवशी कार्यालय प्रमुख हे शासकीय कामानिमित्त नागपूर येथे गेले असल्याने पुढील सुनावणी १९ एप्रिल रोजी निश्चित करण्यात आली. सदर सुनावणीच्या दिवशी वकिलांनी मुदत मिळण्याकरिता कार्यालयाच्या ई-मेलवर विनंती अर्ज सादर केला. तसेच कोरोनाच्या प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी यांनी निर्मित केलेल्या निर्देशानुसार सदरहू सुनावणी कामकाज स्थगित केले.
बॉक्स
कारवाईकडे नागरिकांचे लक्ष
जिल्हा निबंधकांनी १६ एप्रिल रोजी पुन्हा बाजार समिती प्रशासनाला कारणे दाखवा नोटीसची सुनावणी ७ मे रोजी घेण्यात येत असल्याचे
निर्देश दिले. यात बाजार समिती प्रशासनाला स्वतः तथा आपल्या प्रतिनिधीमार्फत आवश्यक कागदपत्रांसह ४८ तासांच्या आत कोरोना विषाणूच्या सक्षम प्राधिकरणाने निर्गमित केलेल्या निगेटिव्ह अहवालासह उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. सुनावणीनंतर जिल्हा उपनिबंधक यांच्याकडून कोणती कारवाई करण्यात येते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.