भंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा तसेच ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी मागील पाच दिवसांपासून संपावर आहेत. त्यामुळे आरोग्यसेवा विस्कळीत झाली आहे. रुग्णांचे बेहाल होत असून गंभीर रुग्णांना जीवही गमवावा लागत आहे.महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट अ संघटनेने प्रलंबित विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी १ जुलैपासून बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्यसेवा वाऱ्यावर असून रुग्णांची हेडसांड होत आहे. तज्ञ डॉक्टरांअभावी रुग्णांना शासकीय रुग्णालयातून खाजगी रूग्णालयात रेफर करवून घेण्याची वेळ आली आहे. खाजगी रुग्णालय गर्दीने फुलले आहे.सध्या जिल्ह्याची आरोग्यसेवा ७१ कंत्राटी डॉक्टरांच्या भरवशावर आहे. संपकर्त्यांशी मुख्यमंत्री चव्हाण यांनी चर्चा करुन मागण्या सोडविण्याचे आश्वासन दिले होते. संघटनेने शासनाला दहा दिवसांचा अल्टीमेटम दिला होता.परंतु आश्वासनाची पूर्तता करण्यात आली नाही. त्यामुळे राज्यातील डॉक्टरांनी १ जुलैपासून बेमुदत संपाला प्रारंभ केला. संघटनेमार्फत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शासनाकडे सामूहिक राजीनामे पाठविले आहेत. सामान्य रुग्णालयात रुग्णांचे नातेवाईक जोखीम न स्वीकारता खाजगी रुग्णालयात रेफर करुन घेत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शासकीय रुग्णालये ओसाड पडली आहेत. बाह्यरुग्ण तपासणीसाठी आलेल्या रुग्णांना आल्यापावली परत जावे लागत आहे.मागण्यांवर तोडगा न निघाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा मॅग्मोचे जिल्हाध्यक्ष डॉ. मधुुकर कुंभरे, डॉ.विरेंद्र कुकडे, डॉ. पंकज येवले, डॉ. प्रशांत उईके, डॉ. सुनीता वाघमारे, डॉ. विजय वासनिक, डॉ. शंकर कैकाडे, डॉ. विलास मेश्राम, डॉ. अनुराधा जुमनाके, डॉ. नचिकेत पातुरकर, डॉ. सतीश मेश्राम आदींनी दिला आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)
आरोग्यसेवा वाऱ्यावर
By admin | Updated: July 5, 2014 23:24 IST