करडी (पालोरा) : जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा नवेगाव (बु.) येथील मुख्याध्यापक देवराव बुरे शाळेला कोणतीही माहिती लेखी किंवा तोंडी सूचना न देता चार ते पाच दिवसांपासून सतत गैरहजर आहेत. त्यामुळे शाळेचे कामकाज अडकले असून त्यांचेवर कारवाईची मागणी शाळा व्यवस्थापन समितीने गटशिक्षणाधिकारी मोहाडी यांना तक्रार निवेदनाद्वारे केली आहे.मोहाडी तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा नवेगाव (बु.) येथे कार्यरत मुख्याध्यापक देवराम बुरे शाळेसाठी त्रासदायक ठरू पाहत आहेत. त्यांच्या गैरवर्तनामुळे शाळेची प्रतिमा खालावली असून मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शाळा गावाची की मुख्याध्यापकाची असा प्रश्नही त्यांच्या कार्यप्रणालीमुळे गावात विचारला जात आहे. गलेललठ्ठ पगार असतानाही त्यांना शाळेचा विसर पडला असून मुलांची प्रगती खुंटलेली आहे. मुख्याध्यापक व्यसनाच्या आहारी गेल्यामुळेच ते सतत गैरहजर असल्याची चर्चा गावात आहे. मुख्याध्यापक देवराम बुरे शाळा व्यवस्थापन समिती किंवा शाळेतील शिक्षकांना कोणतीही सूचना न देता, सुटीचा अर्ज सुद्धा न देता सतत शाळेत गैरहजर आहेत. दि. ९ मार्च ते १४ मार्चपर्यंत ते सतत गैरहजर आहेत. त्यांच्या संबंधाने शाळा व्यवस्थापन समितीच्या अनेक तक्रारी आहेत. समिती सदस्यांची मासिक सभा बोलावून स्वत:च सभेत गैरहजर राहतात. शाळेतील दस्तऐवज बरोबर ठेवत नाही. हिशेब किंवा अन्य कागदपत्रेही समितीला दाखवित नाहीत. त्यांच्या गैरवर्तनामुळे शाळेचे नुकसान होत असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जगन्नाथ गोमासे, उपाध्यक्ष चंद्रभान मंडपे, सदस्य गौरीशंकर चकोले, मिताराम तिबुडे, हुकदास पुराम यांनी केली आहे. तसे निवेदनही मोहाडी गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आले आहे. (वार्ताहर)
अर्ज न देता मुख्याध्यापक सतत गैरहजर
By admin | Updated: March 16, 2015 00:30 IST