भंडारा : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष संदीप कदम यांनी ५ एप्रिल रोजी मनाई आदेश काढला. या आदेशात मुद्दा क्रमांक १२ वर शाळेबाबतीत माहिती आहे. यात १२ अ मध्ये शाळा व महाविद्यालय बंद राहतील, असा स्पष्ट उल्लेख केला आहे. मात्र १२ आ मध्ये १० वी व १२ वीच्या परीक्षेच्या विद्यार्थ्यांना सदरबाबत मुभा देण्यात येत आहे, हा मुद्दा घालण्यात आला आहे. शिक्षणाधिकारी यांनी यावर स्वतंत्र पत्र न काढल्याने व अर्थ वेगळा काढून शाळेत सर्व शिक्षकांना व १० वी व १२ वीच्या मुलांना शाळेत बोलाविणे सुरूच ठेवले. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असून शाळा, महाविद्यालय बंदबाबतीत मुख्याध्यापक संभ्रमात आहेत.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लोकांचा समूह एकत्र जमू न देता व कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी संपूर्ण भंडारा जिल्ह्यामध्ये भंडारा जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १ ९ ७३ चे कलम १४ अन्वये दि. ५ एप्रिल २०२१ रोजी मनाई आदेश काढला. या मनाई आदेशात मुद्दा क्रमांक १२ वर शाळेबाबतीत माहिती आहे. यात ‘शाळा व महाविद्यालय बंद राहतील’ असा स्पष्ट उल्लेख केला आहे . मात्र ‘१० वी व १२ वीच्या परीक्षेच्या विद्यार्थ्यांना सदरबाबत मुभा देण्यात येत आहे, हा मुद्दा घालण्यात आला आहे. याचा सरळ अर्थ शाळा व महाविद्यालय बंद राहतील. मात्र दहावी व १२ वी परीक्षेच्या विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र वितरण करणे व परीक्षेच्या तयारीचे काम सुरू राहील, असा होता. एकाही मुलाला व शिक्षकांना शाळेत बोलवायचे नाही, असा होत असताना शिक्षणाधिकारी यांनी स्वतंत्र असा वेगळा आदेश न काढल्याने प्राचार्य, मुख्याध्यापक संभ्रमात आहेत. त्यामुळे त्यांनी शाळेत सर्व शिक्षकांना व इयत्ता १० वी तसेच १२ वीच्या मुलांना शाळेत बोलाविणे सुरूच ठेवले. काही शाळेत मुख्याध्यापक शिक्षकांना वर्ग ५ वी व ८ वीच्या प्रवेशासाठी गावागावात पाठवीत आहेत. ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. अशावेळी एखादा शालेय कर्मचारी बळी पडल्यास त्याला कारणीभूत कोण राहणार, असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.
शिक्षणाधिकाऱ्यांनी स्वतंत्र आदेश काढलाच नाही
वास्तविक शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे इतर जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी यांनी यापूर्वीच शाळा बंद करण्याचे आदेश देऊन विद्यार्थ्यांना व शिक्षकांना शाळेत बोलवायचे नाही, असे निर्देश दिले आहे. परंतु भंडारा शिक्षणाधिकारी याला अपवाद ठरले. त्यांनी शिक्षण विभागाच्या वतीने कोणतेही स्वतंत्र आदेश काढले नाही. यापूर्वीच्या लॉकडाऊनमध्ये शाळा बदल मार्गदर्शक सूचना होत्या. परंतु यावेळी कोरोनाचा उद्रेक पाहता कठोर निर्बंध लादलेले आहेत. त्यानुसार शाळा बंद म्हणजे पूर्णत: बंद, असा अर्थ होता. फक्त १० वी व १२ वीच्या परीक्षेच्या वेळी शिक्षकांना बोलाविण्यात येईल. त्यांना त्यावेळी शाळेत येणे आवश्यक आहे, असा अर्थ होत असल्याचे मत अनेक शिक्षकांनी व शिक्षक संघटनांनी व्यक्त केले आहे.
कर्मचारीच लपवितात कोरोनाबाधित झाल्याची माहिती
शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालयातील अनेक कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत. मात्र याची माहिती ते आपल्या अधिनस्थ अधिकाऱ्यांपासून लपवीत आहेत. दुसऱ्यात तब्येतीची कारणे सांगून सुटीवर राहतात. परिणामतः किती कर्मचारी, शिक्षक कोरोनाबाधित झाले याची नक्की माहिती कळत नाही. कोरोनाबाधित कर्मचाऱ्याला १४ दिवसाच्या शासकीय सुट्या मिळतात. परंतु आपणास कोरोना झाल्याची माहिती इतरांना कळल्यास ते आपल्याकडे वेगळ्या नजरने पाहतील, असे समजून कोरोनाबाधित असतानाही कुठला तरी आजार होता, असे सांगून पाच-सहा दिवसातच कार्यालयात वा शाळेत उपस्थित राहतात. वास्तविक विलगीकरणाचा कालावधी २१ दिवसाचा असताना ते पाच-सहा दिवसात कार्यालयात वा शाळेत उपस्थित होत असल्याने त्यांच्यापासून कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.