जांब (जि.भंडारा) : आपल्याला बाळ होणार ही बाबच माझ्यासाठी लाखमोलाची होती. चिमुकलीला जन्म दिला. तिचा तो गोंडस चेहरा अजूनही डोळ्यासमोर आहे. अचानक ती मला सोडून निघून जाईल, अशी कल्पनाही करणे अशक्य. शनिवारचा दिवस मी कधीही विसरू शकणार नाही. दादा, माझी झोळी रिकामीच राहिली हो, असे भावोद्गार प्रियंका जयंत बसेशंकर या मातेने व्यक्त केले. मोहाडी तालुक्यातील जांब लोहारा येथील रहिवासी असलेल्या प्रियंकाला १० डिसेंबरला प्रसूतीसाठी जिल्हा रुग्णालयात भरती केले होते. १२ डिसेंबरला प्रियंकाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र, मुलगी अशक्त असल्यामुळे तिला एसएनसीयू कक्षामध्ये ठेवण्यात आले होते. मात्र, तिच्या मृत्यूची वार्ता मिळाली, असे प्रियंकाचे पती जयंत बसेशंकर यांनी सांगितले. जयंत हा रोज मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितो. एकत्र कुटुंबासोबत राहत असलेल्या जयंत आणि प्रियंका यांच्यावर जणू दुःखाचे डोंगरच कोसळले आहे.
दादा, माझी झोळी रिकामीच राहिली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:27 IST