लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारावर अनेकांनी शासकीय नोकऱ्या लाटल्या, पदोन्नतीही मिळविली. या प्रकरणाच्या पाठपुराव्यानंतर पालकमंत्री संजय सावकारे यांनी ८ जूनला चौकशीचे आश्वासन दिले होते. एक महिन्यात दोषींवर कारवाईचे निर्देशही दिले होते. मात्र, दीड महिना तपास फारसा पुढे न सरकल्याने या चौकशीबद्दल संशय घेतला जात आहे. यात नेमकी कुणाची आणि कुणाच्या सांगण्यावरून पाठराखण केली जात आहे, असा प्रश्न विचारला जात आहे.
भंडारा येथील सामाजिक कार्यकर्ते विजय क्षीरसागर यांनी या प्रकरणाची मागणी वर्षभरापासून लावून धरली आहे. पाठपुराव्यानंतर, जिल्ह्यात महसूल विभागात कार्यरत असलेल्या २२ दिव्यांगांपैकी फक्त १० जणांच्याच प्रमाणपत्राची चौकशी झाल्याची माहिती आहे. यात काही उमेदवारांची प्रमाणपत्र संशयास्पद असल्याची माहिती आहे. यातील, १२ जणांच्या प्रमाणपत्रांची आणि वैद्यकीय तपासणीत चालढकल सुरू असल्याने शंका घेतली जात आहे. बच्चू कडू यांच्या अल्टीमेटमनंतर प्रशासन काय कारवाई करणार याकडे लक्ष आहे.
...तर काळे फासू : बच्चू कडू यांनी दिला अल्टिमेटमराज्यात शासकीय सेवेत साडेतीनशे बोगस दिव्यांग कार्यरत आहेत. हे प्रकरण गंभीर असताना आणि प्रशासनाला पुरावे देऊनही भंडाऱ्यात कारवाई न होणे हे गंभीर आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात आठवडाभरात कारवाई करावी, अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीला काळे फासू, असा इशारा बच्चू कडू यांनी बुधवारी दिला आहे.
"या प्रकरणात आपण जिल्हा शल्य चिकित्सकांना भेटूनही तपासणीची माहिती आजवर मिळाली नाही. अनेक संशयित अपंगांनी जिल्हा रुग्णालयात तपासणी केली. ती माहिती मागविल्यावर गोपनीय असल्याचे सांगण्यात आले. यात वेळकाढूपणा व दबावतंत्र दिसत आहे."- विजय क्षीरसागर, सामाजिक कार्यकर्ते, भंडारा