पुरुषोत्तम डोमळे लोकमत न्यूज नेटवर्क सानगडी : साकोली तालुक्यातील सानगडी या ऐतिहासिक गावाला तहसीलचा दर्जा द्यावा आणि येथे तहसील कार्यलय उभारावे, ही मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. अद्याप प्रशासनाने या मागणीची दखल घेतली नाही. मात्र परिसरातील ग्रामस्थांची आणि सानगडीतील नागरिकांची आशा मात्र कायम आहे.
पूर्वी सानगडी गाव प्रगणे म्हणून अस्तित्वात होते. या गावची बाजारपेठ मोठी असून परिसरातील गावकरी बाजारहाट व खरेदीसाठी येथे येत असतात. लगतच्या गावांचा दैनंदिन संबंध सानगडीसोबत येत असतो. गावची लोकसंख्या मोठी असून गावाची रचनाही चांगली आहे. या गावाला वेगळा इतिहास असून येथे ४२ स्वातंत्र्यसंग्राम सैनिक होऊन गेले. गावालगतच ऐतिहासिक किल्ला आहे. या सहानगड किल्ल्याला नुकताच 'क' दर्जाचा पर्यटन स्थळचा दर्जा मिळाला असून येथे बहुसंख्येने पर्यटक भेटी देतात. सानगडी किल्ल्यालगत तलाव असून मासेमारीकरिता प्रसिद्ध आहे. वनराईच्या कुशीत वासलेले १० हजार लोकसंख्या असलेले सानगडी अनेक महामार्गाने जोडलेले आहे येथूनच प्रतापगढ, नावेगाव बांध, गोठणगाव या प्रेक्षणीय स्थळांला जाण्याचा मार्ग आहे.
साकोली, लाखांदूर, अर्जुनी नावेगाव बांध, भुगाव पंढरपूर, गोंडउमरी रेल्वे आदी मार्गावर सानगडीवरून जावे लागते. परिससरात सानगडीचा आठवडी बाजार प्रसिद्ध आहे. लगत चुलबंद नदी वाहत असून चार रेतीघाट आहेत. कृषी उत्पन्न बाजार समिती, बाजार समिती उपआवार सानगडी येथे दररोज जनावरांचा बाजार भरतो. सानगडीच्या बाजूला साकोली, लाखनी, मोरगाव अर्जुनी, लाखांदूर हे चार तालुके १५ ते २० किलोमीटर अंतरावर आहेत. सानगडीचे नाव तहसील संभाव्य तालुका म्हणून नेहमीच घेतले जाते. नेतेमंडळीही यासाठी आश्वासन देत असतात. परिसरातील जनतेची बऱ्याच दिवसांपासून मागणी आहे.
२१ हनुमंतांची मंदिरेसानगडी मोठे गाव असून चार ते पाच खुली मैदाने आहेत. पाच बँका, दोन हायस्कूल, एक वरिष्ठ महाविद्यालय, तीन कॉन्व्हेंट, प्राथमिक आरोग्य केंद्र, पतसंथा, दोन भात गिरणी, खासगी दवाखाने, दोन धान्य खरेदी केंद्र, २१ हनुमंतांची मंदिरे आहेत. ऐतिहासिक वारसा लाभला आहे.