६० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन : प्रेमसागर गणवीर यांचे प्रतिपादनभंडारा : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी विजयादशमीला धम्म दीक्षा दिली. चांगले विचार आणि आचार अंगीकारले तरच समाजात बंधूता व मैत्री नांदेल. संविधानाच्या मार्गानेच समस्या सुटू शकतात म्हणूनच डॉ.बाबासाहेबांची शिकवण समाजातील सर्वच लोकांपर्यंत पोहचविणे आवश्यक आहे, असे विचार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांनी व्यक्त केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती भंडारा येथे ६० व्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.तथागत गौतम बौद्ध व बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून पुर्णाकृती पुतळ्याला पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. संस्थेचे सचिव हर्षल मेश्राम तसेच महेंद्र वाहाणे यांनी सामूहिक बुद्धवंदना घेतली. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य प्यारेलाल वाघमारे म्हणाले, महामानवाची शिकवण ही सर्वांसाठी असते. शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा हा मुळ मंत्र सर्वच भारतीयांनी अंगीकारावा. डॉ.सच्चिदानंद फुलेकर यांनी आंबेडकरी समाजाला कर्तव्याची जाणीव होणे व सामाजिक न्यायासाठी संघर्ष कसा करावा लागतो असे सांगितले. प्रभाकर भोयर यांनी अधिक बोलण्यापेक्षा कृती करावी. प्रा.पुरण लोणारे यांनी चळवळीचा इतिहास व अस्तित्वाचा लढा एकत्रित लढावा लागेल असे सांगितले. हिवराज उके यांनी जाती अंताचा लढा लढताना सर्वांनी धर्मनिरपेक्ष वृत्तीने कृतीने एकत्रित येऊन अन्यायाच्या विरोधात लढा द्यावा. संजय केवट यांनी ओबीसी बांधवांनी सुद्धा या कार्यक्रमात उपस्थित व्हावे, असे संबोधन केले. सूर्यकांत हुमने यांनी दलितांवर होणाऱ्या अन्यायाच्या विविध घटना सांगून संघटीत होणे महत्वाचे आहे, असे सांगितले. वसंत हुमणे यांनी सर्वांच्या सहकार्याबद्दल आभार मानले. पुतळा निर्मितीच्या कामात ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.संचालन महेंद्र वाहाणे यांनी केले. प्रास्ताविक आणि आभार संस्थेचे सचिव हर्षल मेश्राम यांनी केले. धम्म गाथेनी कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमासाठी कोषाध्यक्ष पी.के. नंदागवळी, मदन बागडे, बी.सी. गजभिये, महादेव मेश्राम, कैलास टेंभुर्णे एस.के. भादुडी, इंदिराबाई सतदेवे, पुर्णा सतदेवे, निर्मला गोस्वामी यांनी सहकार्य केले. भंडारा शहरातील सत्तार गुरुजी, यशवंत वैद्य, युवराज रामटेके, शांताबाई बडोले, भाविका उके, सुरेखा रामटेके, मंदा मेश्राम, सुनिता बन्सोड, सुजाता घोडीचोर, सरिता घोडीचोर उपस्थित होते.
बाबासाहेबांची शिकवण समाजात पोहचवा
By admin | Updated: October 13, 2016 01:02 IST