भंडारा : लोकसभेपाठोपाठ राज्यातही परिवर्तनाच्या लाटेतून भंडारा, तुमसर, साकोली विधानसभा क्षेत्रही सुटले नाही. कोमेजलेल्या चेहऱ्यामधून कमळ फुलले अन् जल्लोषाचा वातावरण बरेच काही सांगून गेला. सकाळी ८ वाजतापासून सुरू झालेली मतमोजणी दुपारपर्यंत सुरूच होती. या कालावधीत पराभूत उमेदवारांच्या प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांचे चेहरे पाहण्यासारखे होते. कोमेजलेल्या नेत्रबिंदूत धिरगंभीर वातावरण निर्माण होत होते. आता पुढे काय होणार याची शाश्वती चेहऱ्यावर स्पष्ट झळकत होती. तिन्ही क्षेत्रातील मतमोजणी सुरू असलेल्या स्ट्राँगरुम परिसरात कुणाला किती मते मिळाली याची चुणुकही लागताच धास्तावलेले चेहरे आकडेवारीच्या आवाजाकडे लक्ष देत होते. सर्वाधिक धीरगंभीर चेहरे भंडारा क्षेत्रात पहावयास मिळाले. शिवसेनेमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली होती. अनेक कार्यकर्त्यांनी अश्रुला वाट मोकळी करुन दिली होती.प्रत्येक फेरीत हृदयाचे ठोके वाढत असताना मिळत असलेली उमेदवाराला मते बाहेरील वातावरण तापवत होती. सुरुवातीच्या सात फेऱ्यांनंतर वातावरण धिरगंभीर होऊ लागले. दहाव्या फेरीत मात्र चेहऱ्यावरील संयम तुटला. आशेची किरण मावळताना दिसली. दुपारपर्यंत स्ट्राँगरुम परिसरातील प्रतिनिधी हळूहळू बाहेर निघत होते. विजयी उमेदवाराचा जल्लोष साजरा करण्यासाठी कार्यकर्त्यांची मार्गावर गर्दी जमत होती. घोषणाबााजीमुळे बाहेरील वातावरण विजयाचे तर कोमेजलेल्या चेहऱ्यांना बघून वातावरण तणावाचे होते.भाजपचे उमेदवार अॅड. रामचंद्र अवसरे, चरण वाघमारे, राजेश काशीवार हे मोठ्या मताधिक्याने निवडून आल्याची घोषणा झाल्यानंतर कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. विजयाची घोषणा होण्यापुर्वीच भंडारा, तुमसर, साकोलीत विजयी मिरवणुक काढण्यात आली. विजयांच्या घोषणाने आसमंत दणाणून गेले. दुसरीकडे पराभूत गटातील सदस्यांच्या चेहऱ्यावरचा ताण आणि चिंता स्पष्ट दिसत होती. दुरदर्शनच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात भाजपची लाट दिसत असताना जिल्ह्यातही तशीच स्थिती राहणार काय? या विवंचनेत पदाधिकारी व कार्यकर्ते दिसत होते. दुपारनंतर मात्र रस्त्यावर फक्त विजयी उमेदवारांची गर्दी दिसत होती. नारेबाजीत मोदींचे नाव प्राधान्याने घेतले जात होते. सांयकाळी निवडणुक अधिकाऱ्यांकडून भाजपचे उमेदवार अॅड. रामचंद्र अवसरे, चरण वाघमारे, राजेश काशिवार यांनी जेव्हा विजयाचे प्रमाणपत्र स्वीकारले तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार प्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते. भाजपच्या एकहाती विजयानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि बसपा या पक्षांवर पराभव होण्याची कारणे शोधण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात ‘भाजपमध्ये उत्साहच उत्साह तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या पक्षात निरुत्साह दिसून आला. (नगर प्रतिनिधी)
कोमेजलेले चेहरे आणि धीरगंभीर वातावरण
By admin | Updated: October 19, 2014 23:16 IST