भंडारा : शासनाच्या आदेशानुसार राज्यातील ३८७ ग्रामीण रुग्णालय, ८१ उपजिल्हा रुग्णालय, ४ सामान्य रुग्णालयातील रुग्णांना मोफत जेवण मिळणार आहे. शिवाय राज्यातील २३ जिल्हा रुग्णालय, ११ महिला रुग्णालय येथे २६ नोव्हेंबर २०१४ रोजी आदेशानुसार ही मोफत जेवणाची ही सुविधा २५ डिसेंबर २०१४ पासून सुरु करण्यात आली आहे.या संपूर्ण प्रक्रियेवर विशेष समितीचे नियंत्रण राहणार असून शासनाने ठरवून दिलेल्या अटी व नियमानुसार निविदा प्रक्रिया राबविण्यात येतात. जिल्ह्यात मोफत जेवण पुरविण्याची प्रक्रिया सुरु आहे आणि त्यावर आमच्या विभागाचे नियंत्रण आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यातील ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाांन खासगी संस्थेमार्फत आहार सेवा पुरविण्याची प्रक्रिया ८ ते ३० मार्च दरम्यान राज्यातील ३३ जिल्ह्यातील रुग्णालयामध्ये राबविली जाणार आहे. रुग्णलयातील रुग्णांसाठी असलेले स्वयंपाकगृह कंत्राटीपद्धतीने चालविण्याबाबत यापूर्वी महाराष्ट्र शासन डायरेक्टर आॅफ हेल्थ सर्व्हीसेस, मुंबई यांच्या वतीने २६ नोव्हेंबर २०१४ रोजी आदेश काढला होता. त्यानुसार राज्यातील २३ जिल्ह्यातील रुग्णालयातील रुग्णांना २५ डिसेंबरपासून मोफत जेवण पुरविण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. याच धर्तीवर ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना खासगी संस्थेमार्फत मोफत जेवण देण्यात येणार असून जिल्हास्तरावरून निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे.शिवाय जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, अधिसेविका, आहारतज्ज्ञ, उपसंचालक कार्यालय प्रतिनिधी, मुख्य प्रशासकीय अधिकारी यांच्या विशेष समितीचे प्रक्रियेवर नियंत्रण राहणार आहे. शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार रुग्णांना १०० ग्रॅमची पोळी, १०० ग्रॅम भात, ७० ग्रॅम तूर डाळ, १२५ ग्रॅम भाजी पुरविली जाते. हे निकष कंत्राटदारासाठीही कायम ठेवण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)जिल्हा सामान्य रुग्णालयाप्रमाणे आता राज्यातील ग्रामीण तसेच उपजिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णांना खासगी पद्धतीने आहार सुविधा पुरविण्यात येणार आहे. याबाबतच्या निर्णयाला ७ मार्च रोजी शासनाने मान्यता दिली आहे. भंडारा जिल्हा रुग्णालयातही वर्धा येथील एजंसीमार्फत रुग्णांना जेवण दिले जात आहे.- डॉ.देवेंद्र पातुरकरजिल्हा शल्यचिकित्सक, भंडारा.या जिल्ह्यात राबविणार प्रक्रियाभंडारा, वर्धा, गोंदिया, वाशिम, अकोला, नागपूर, अमरावती, गोंदिया, जालना, लातूर, ठाणे, रायगड, पुणे, नाशिक, जळगाव, नंदूरबार, अहमदनगर, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, बुलडाणा, गडचिरोली, चंद्रपूर, परभणी, हिंगोली, बीड, उस्मानाबाद, धुळे, नांदेड कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पालघर या जिल्ह्यातील ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयात ही प्रक्रिया राबविली जाणार आहे.
कंत्राटी पद्धतीने रुग्णांना मोफत जेवण
By admin | Updated: March 16, 2015 00:29 IST